मुंबई । वार्ताहर
राज्यातील रूग्णांची संख्या नित्यनियमाने वाढत असून केंद्र सरकारनेही दोन दिवसांपूर्वीच लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडींच्या नेत्यांची बैठक आज मुंबईमध्ये घेतली. त्या बैठकीमध्ये लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात एकमत झाले आहे, मात्र केंद्र सरकारचे निकष, नियम आणि अटी 18 मे पर्यंत आल्यानंतर 31 मे पर्यंतच्या लॉकडाऊनची घोषणा केली जाईल असेही या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवलं जाणार असल्याची घोषणा केली असून ते कधीपर्यंत वाढवलं जाणार आहे याबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. केंद्र सरकारकडून जोपर्यंत लॉकडाउन 4 च्या नव्या अटी-शर्थींची सविस्तर माहिती दिली जात नाही तोपर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाणार नाही अशी सुत्रांची माहिती आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला हजर होते.
Leave a comment