बीजिंग:
चीनच्या वुहानमधून जगभरात कोरोनाचा फैलाव झाला. चीन सरकारनं लॉकडाऊन करत वुहानमधील परिस्थिती नियंत्रणात आणली. महिन्याभरापूर्वी चीननं वुहानमधील लॉकडाऊन उठवला. त्यानंतर आता पुन्हा एकदा वुहानमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रशासनानं वुहानमधील निर्बंध हटवले आणि कार्यालयं सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र जनजीवन पूर्वपदावर येताच कोरोनानं डोकं वर काढलं आहे. वुहानमध्ये कोरोनाचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत. हे सगळे रुग्ण एकाच परिसरातले आहेत. एका ८९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्याच्या संपर्कात आल्यानं त्याच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाली.
कोरोनाची बाधा झालेल्या पाचही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाही. मात्र त्यांच्या माध्यमातून इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनाची लक्षणं दिसून न येणाऱ्या रुग्णांची नेमकी संख्या उपलब्ध नाही. कोरोना चाचणी झाल्यानंतरच अशा रुग्णांची नोंद होते. त्यानंतर त्यांना कोणाच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्यामुळे नेमक्या कोणा कोणाला कोरोनाची बाधा झाली, त्याचा शोध घेतला जातो.
चीननं कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही लक्षणं दिसून न येणाऱ्या रुग्णांचा आकडा धरलेला नाही. चीनमध्ये सध्या कोरोनाचे ८२ हजार ९१८ रुग्ण आहेत. वुहानमध्ये लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. एप्रिलपासून चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी होताना दिसत आहे. फेब्रुवारीत चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. त्यानंतर लॉकडाऊन, चाचण्या, क्वारंटाईन अशी पावलं उचलून चीननं कोरोनार नियंत्रण मिळवलं.
Leave a comment