बीड । वार्ताहार
राज्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध होणार नसेल तर आपण लढणारच नाही असा इशारा दिल्या नंतर कॉग्रेसने नरमाईची भूमिका घेत आपला एक उमेदवार माघार घेण्याचा निर्णय घेतला असून बीड चे जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांना थांबण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे मोदी यांच्या कृपेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत 9 जागांवर काँग्रेस पक्षाने क्षमतेपेक्षा अधिक एक उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे विधानपरिषद निवडणूक घेण्याची वेळ येणार होती. मात्र आता महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने एक उमेदवार मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीने 6 जागा लढाव्यात अशी आमची अपेक्षा होती. मात्र सध्या कोरोनाचे संकट असून, निवडणुकीसाठी आमदारांना मुंबईत यावे लागले असते. त्यामुळे आम्ही आजच्या बैठकीत पाच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होती. त्यानुसार बैठकीत चर्चा झाली आणि निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. महाविकास आघाडीचे घटक म्हणून काँग्रेसने निर्णय घेतला.त्यानुसार बीडचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांची उमदेवारी कॉग्रेसने मागे घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली असून मोदींच्या माघारीमुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचे चर्चेीले जात आहे.
नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दोन जागा लढविल्या होत्या. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीने एकच आमदारकी घेऊन काँग्रेसला दोन जागांची संधी द्यावी, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये होता. त्यामुळे काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर (पापा) मोदी यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीनेही दोन उमेदवारांची घोषणा केली. आघाडी धर्मामुळे राष्ट्रवादीने एकच उमेदवार घोषित करायला हवा होता, असेही काँग्रेसच्या वर्तुळात कुजबूज केली जात आहे. महाविकास आघाडीचे सर्व पाच उमेदवार आता उद्या 11 मे रोजी आपले अर्ज भरणार आहेत. भाजपच्या चार उमेदवारांनी याआधीच आपले अर्ज सादर केले आहेत.
Leave a comment