काँग्रेसच्या मनधरणीसाठी 'मातोश्री'वरून खास निरोप
काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने आघाडीत धुसफूस
मुंबई । वार्ताहर
विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी होणार्या निवडणूकीत काँग्रेसने ऐनवेळी दोन उमेदवार दिल्याने महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये धुसफूस निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर थेट निवडणूक न लढण्याचाच निरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठवला आहे. काँग्रेसच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहेत. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आज दुपारी या संदर्भात महाविकास आघाडी नेत्यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.
विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. काँग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहा जागा लढवण्याबाबत काँग्रेस अजूनही ठाम आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दुसर्या उमेदवारांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत चिंता वाढली आहे. दरम्यान शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी रात्री 10 च्या सुमारास बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही थोरातांना उमेदवार मागे घेण्यासाठी संपर्क केला असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण,नितीन राऊत आणि सतेज पाटील यांच्यात आज बैठक झाली असून सहाव्या जागेबाबत काँग्रेस अजूनही ठाम असल्याची माहिती आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर काँग्रेस चर्चा करणार आहेत.
Leave a comment