सरकारच्या सतत बदलणार्या निर्णयामुळे नागरिक हैराण
आता केवळ मजुरांसाठीच मोफत एसटी बस
मुंबई । वार्ताहर
कोरोनामुळे संबंध देश हैराण आहे. अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना आपले गाव जवळ कधी करु हा प्रश्न सतावत आहे. त्यात ऑनलाईन फॉर्म भरा, मेडिकल सर्टिफिकेट जोडा असे निर्णय घेतले गेले. त्यानंतर राज्यभरात एसटीचा प्रवास मोफत असेल अशी घोषणा केली गेली, मात्र हा निर्णयही रात्रीतून सरकारने बदलला अन् केवळ परप्रांतीय मजुरांसाठीच बससेवा मोफत असेल असे आता जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागात अडकलेले लोक पुरते हवालदिल झाले आहेत. आम्हाला एकदाचे आमच्या गावी पाठवा पण तासा-तासाला निर्णय बदलून मानसिक जाच करु नका अशा संतप्त भावना हे प्रवासी नागरिक व्यक्त करु लागले आहेत. शासनाने जनतेला आधार द्यायला हवा. मात्र हे होताना दिसत नाही.
यापूर्वी राज्यभरात एसटीचा मोफत प्रवास जाहीर केल्यानंतर शनिवारी रात्री सरकारचे घुमजाव करणारे स्पष्टीकरण आले. मोफत सेवा ही राज्यातील अंतर्गत प्रवासासाठी नाही, अशा आशयाचे पत्रक मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या इतर राज्यातील मजूरांना महाराष्ट्रातील त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहचवण्यासाठी आणि इतर राज्यात अडकलेले मजूर जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठीच मोफत एसटी प्रवास असेल असे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय कोणत्याही इतर प्रवासासाठी राज्य परिवहन विभागाची बससेवा मोफत उपलब्ध असणार नाही, असे या पत्रकात म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे पत्रक ट्वीट केले आहे.
एसटी संदर्भातील निर्णय बदलल्याने राज्यातील लोकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण होणार असल्याचे चिन्ह आहे. कारण काल, 9 मे रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी लॉकडाऊनमुळे राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी एसटीतर्फे मोफत सेवा देण्याबाबत घोषणा केली होती. ही मोफत बस सेवा येत्या 18 मे पर्यंतच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
Leave a comment