अगदी या उक्ती प्रमाणे सुसंस्कारित आणि सचोटीने जगणारी माणसंच आयुष्यात सर्वार्थाने यशस्वी होतात, कारण त्यांच्या यशाला नैतिक अधिष्ठान असतं. *श्री .किसनलालजी रतनचंदजी मुनोत* हे असेच एक व्यक्तिमत्त्व. बीडकरांना सुपरिचित असणारं नावं. जसं देशात टाटा हा उद्योगसमूह त्यांच्या सचोटी आणि देशभक्तीबद्दल ओळखला जातो, तसंच हे मुनोत कुटुंब कापड व्यवसायामुळे बीड जिल्ह्यात ओळखले जाते.किसनलाल यांनी आपल्या कापड व्यवसायाची सुरुवात ते स्वतः आणि एक नौकर अशी अवघ्या दोन माणसांवर केली होती. त्याचं आज अक्षरशः वटवृक्षात रूपांतर झालं आहे. मुनोत क्लाथ स्टोअर्स ते पायल साडी सेंटर असा तो प्रवास आहे . दिसायला सोपा ,सहज पण प्रत्यक्षात खडतर आणि प्रचंड मेहनतीचा.
किसनलालजी मुनोत यांचा जन्म दि. 5 एप्रिल 1935 चा, पाटोदा तालुक्यातील रायमोहचा, वडिलांचं किराणा दुकान ,त्याकाळी किसनलालजी यांनी कूसळंब,जामखेड,पाथर्डी आणि रायमोह येथे शिक्षण घेत त्याकाळची मॅट्रिक म्हणजे अकरावी पर्यंत शिक्षण घेतलं.या शिक्षणाच्या जोरावर त्यांना धारूर येथे शिक्षकाची नौकरी सुध्दा मिळाली पण किसनलालजी यांनी नौकरी स्वीकारली नाही,कारण एकच व्यवसाय करून स्वयंपूर्ण होण्याची इच्छा.किसनलालजीनी 1950-51 साली पाटोदा इथं कापड दुकान सुरू केलं ,काही काळ तिथं व्यवसाय केल्यानंतर त्यांनी बीड येथे यायचं ठरवलं.त्यांचा हा निर्णय त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला.बीडला 1967 साली त्यांनी सुभाष रोडला दत्त मंदिराजवळ अश्रूबा कुटे यांच्या जागेत कापड दुकान सुरू केलं ते अवघ्या दहा बाय तीस फूट एवढंच क्षेत्रफळ असणाऱ्या जागेत.किसनलालजी सांगतात पन्नास पैसे मीटर पासून मी कापड विकलय .हे दुकान भागीदारीत होतं नंतर 1970 ला स्वतंत्र होऊन मुनोत क्लॉथ सेंटर सुरू केलं.
या स्वतंत्र व्यवसायासाठी मुनोत बंधूंना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.अशावेळी त्यांचे स्नेही व नातेवाईक असलेले स्वातंत्र्य सैनिक स्व.झुंबरलालजी कांकरिया यांनी आर्थिक मदत करून भागीदारीतही सहभागी झाले.त्यांनी त्यावेळी केलेल्या आर्थिक मदतीमुळे व बंधू स्व.उत्तमचंदजी यांचे व श्री फुलचंदजी यांचे मार्गदर्शन तसेच श्री शांतीलालजी यांची साथ या बळावर या व्यवसायाचा विस्तार त्यांना वाढविणे शक्य झाले याची जाणीव ते ठेवतात.आपल्याला व्यवसायात स्थिर होण्यासाठी बहीण पार्वताबाई मिश्रीलाल छाजेड यांनी मोलाची साथ दिल्याची कृतज्ञता किसनलालजी व्यक्त करतात,त्यांनी सांगितलं की तेव्हा माझं जेवण हे बहिणीकडेच असायचं,अन्य मदत देखील तीच करायची. तसेच दुसऱ्या भगिनी सौ.लिलाबाई कचरूलालजी लोढा(चौसाळा)यांचेही सहकार्य लाभले.दि.8फेब्रुवारी 1954 ला श्रीकुंवरबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आज या संसारवेलीवर 3 मुले आणि 2 मुली नातवंडे असा भरगच्च परिवार सुखाने नांदतो आहे.मुले दिलीप,राजेंद्र आणि संजय हे बीडकरांना त्यांच्या व्यवसायिक आणि सामाजिक कार्यातून सुपरिचित आहेत ,तर मुली सौ.सुवर्णा महावीर बलई ( कळंब) आणि सौ.साधना प्रफुल्ल ओस्तवाल ( औरंगाबाद ) या सुखाचा आणि समाधानाचा संसार करीत आहेत.
किसनलालजी यांचं वैशिष्ट्य म्हणजे शारीरिक दृष्ट्या सक्षम असतानाही त्यांनी व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेत सर्व कारभार मुलांकडे सोपवला आणि ते भक्तिमार्गाकडे वळले,त्यांचा जैन धर्माचा अभ्यास स्तिमित करणारा आहे,केवळ वाचन आणि मनन एवढेच न करता त्यांचे गेली काही वर्षे लिखाण देखील सातत्याने चालू आहे.बारीक पण सुवाच्य अक्षरात त्यांनी लिहिलेली हस्तलिखिते त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत व्यवस्थित मांडून ठेवलेली आहेत.आपल्या अध्यात्मिक जीवनावर साध्वी श्री प्रीतीसुधाजी म.सा. आणि प.पू.कंचनकंवरजी म.सा. तसेच व.गुरुदेव प.पू. उत्तममुनींजी म.सा.यांचे वरील असीम श्रद्धा आणि मार्गदर्शन मोलाचे ठरल्याची किसनलालजी यांची नम्र भावना आहे.आगम या जैन धर्मीय ग्रंथाचे वाचन,मनन आणि चिंतन आणि त्यावर भाष्य हे त्यांच्या व्यासंगाचे आणि श्रद्धेचे विषय आहेत. जैन धर्मातील तत्वज्ञान प्रश्नोत्तराच्या माध्यमातून या ग्रंथात चर्चिले गेले आहे. आजही त्यांचा दिनक्रम व्यस्त असतो,पहाटे तीन वाजता उठून ते 45 मिनिटे व्यायाम करतात.सकाळी 6 ते 9 या वेळात ते धार्मिक स्वाध्याय करतात. 10 वाजता जेवण,आणि पुन्हा दिवस भरात अन्य ग्रंथ वाचनात व्यस्त असतात.या आणि एकूणच सांसारिक जीवनात पत्नी सौ. श्रीकंवरबाई यांची आजन्म मोलाची साथ लाभल्याचे ते कृतज्ञतापूर्वक व्यक्त करतात.
किसनलालजी मुनोत हे यशस्वी व्यावसायिक म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी समाजाशी असलेली बांधिलकी आपल्या औदार्यातून आणि कृतिशीलतेतून सदैव जपली.स्वतः आणि विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी गरजू आणि गरीब बांधवांना ,विदयार्थ्यांना, रुग्णांना ,गोशाळांसाठी, आर्थिक मदतीसाठी नेहमी हात पुढे केला.सहकार्य केले.त्यांनी केलेली शिफारस अंतिम मानून आजही अनेक संस्था या आधी मदतीचा धनादेश काढतात आणि नंतर अन्य औपचारिकता पूर्ण करतात हा किसनलालजी यांनी आपल्या सद् वर्तनातून निर्माण केलेला लौकिक आहे.साहजिक समाजाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या वेळोवेळी सोपवल्या ज्या त्यांनी निष्ठेने पार पाडल्या. जैन श्रावक संघ,जैन दिवाकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते.या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी संस्कार शिबिरे,स्वाध्याय शिबिरे आयोजित केली. पायल प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून यशस्वी केले.या त्यांच्या विधायक कार्यात त्यांना स्व.माणिकचंदजी कोटेचा(प.पू. माणकमुनीजी म.सा.) स्व.भोजराजजी खिवंसरा,स्व.भागचंदजी सुराणा यां सह समाजातील आज हयात असलेल्या-नसलेल्या अनेक मान्यवरांची व समाजबांधवांची मोठी साथ त्यांना लाभत आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि संघ विचाराच्या संस्थांत सक्रिय सहभाग, हे हा त्यांचा बालपणीपासूनचा आस्थेचा विषय आहे. समाजाने त्यांच्या कार्याची वेळोवेळी दखल घेत त्यांचा यथोचित सन्मानही केला. रोटरी क्लब बीडच्या वतीने त्यांना व्होकेशनल अवॉर्डने गौरविले तर व्यापारी महासंघाने आदर्श व्यापारी पुरस्कार दिला.अ. भा. जैन संघटनेचा जेष्ठ नागरिक पुरस्कार त्यांना संस्थापक श्री शांतीलालजी मुथा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सर्वार्थाने यशस्वी आणि समाधानी असणारे किसनलालजी सारखी माणसं हे समाजाची संपत्ती आहेत,आदर्श आहेत.जे जे केले ते नैतिकता पाळून, समाजहिताचे भान राखून आणि सचोटीने,म्हणून आज त्यांची भावना सर्वकाही मिळालेल्या योगी पुरुषांसारखी कृतार्थ समाधानाची आहे .म्हणूनच आज त्यांना अन्य काहीही नकोय . *संसार करावा नेटका*! या ओवी नुसार ,चार पिढ्या म्हणजेच मुले ,नातवंडे, पतवंडे यांचा सुखाचा ,समाधानाचा संसार बघत असणारा माणूस फक्त ' संथारा ' मृत्यूची इच्छा व्यक्त करतो.खरंच या काळात अशी माणसं आपल्याभोवती कार्यरत आहेत,त्यांचं अस्तित्व आहे,त्यांच्या सान्निध्यात आपण आहोत हे सांगूनही खरे वाटत नाही पण आपली काहीतरी पूर्वपुण्याई म्हणा पूर्वसंचित म्हणा ते असेल .आज किसनलालजी मुनोत यांनी आज वयाचे 85 वर्षे पूर्ण करून 86व्या वर्षात पदार्पण केले आहे .
वर्धापनदिनाचे औचित्य साधून
त्यांचे अभिष्टचिंतन करतांना आपणच गौरवान्वित आणि कृतार्थ होतो आहोत हीच भावना मनात येते आहे.
--- महेश वाघमारे, बीड.
दि-5 एप्रिल 2020.
Leave a comment