अडकलेल्या नागरिकांना दिलासा द्या;त्यांना हतबल करु नका
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात येण्यासाठी व बीड जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठीचे संकेतस्थळ बीडच्या जिल्हाधिकार्यांनी पुन्हा एकदा बदलले आहे. आता पुर्वीच्याच ‘कोव्हिड1-एम.एच.पोलीस डॉट इन’ या संकेतस्थळावर ई-पास साठी अर्ज करण्याचे आवाहन शनिवारी (दि.9) करण्यात आले आहे. दरम्यान ई-पास साठीच्या संकेतस्थळात दोन वेळेस बदल झाल्याने बाहेर जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. प्रशासनाने एकदाच काय तो अंतिम निर्णय पासबाबतीत घ्यावा परंतु नागरिकांना मानसिक त्रास देवू नये अशा संतप्त भावना काही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
शनिवारी दुपारी बीड जिल्हाधिकार्यांनी नव्याने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, बाहेर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येण्यासाठी beed.gov.in या संकेतस्थळावरुन ई पास देण्याची प्रणाली सुरु करण्यात आली होती.परंतु सद्यस्थितीत संपूर्ण राज्यात वापरण्यात येणारी covid19.mhpolice.in हे संकेतस्थळ या परवानग्यांसाठी वापरले जात आहे. सदरील covid19.mhpolice. हे संकेतस्थळ आणि beed.gov.in या संकेतस्थळावरील व्यवस्था एकमेकांशी सुसंगत नाहीत असे दिसून येते. तसेच covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर परवानगी मिळणे अतिशय सुलभ आहे आणि त्यामुळे हा बदल करुन यापुढे बीड जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी व जिल्ह्याबाहेरुन बीड जिल्ह्यात येण्यासाठी covid19.mhpolice.in हे संकेतस्थळ वापरले जावे. beed.gov.in या संकेतस्थळावरी कार्यान्वीत ई-पास व्यवस्था बंद करण्यात आली आहे मात्र या संकेतस्थळामार्फत यापूर्वी देण्यात आलेले सर्व पासेस वैधच राहतील तसेच इतर जिल्ह्यामधून covid19.mhpolice.in या प्रणालीव्दारे देण्यात आलेले पास पण वैध समजण्यात येतील. दरम्यान हे सुधारित आदेश जिल्हाधिकार्यांनी जारी केले असले तरी मागील चार-पाच दिवसांपासून लशशव.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सांगीतले गेल्याने बाहेर जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने राज्यात जे संकेतस्थळ सर्वत्र वापरले जात आहे तेच बीड जिल्ह्यातही वापरावे, विनाकारण नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होत असेल तर हे चूकीचे असल्याच्या प्रतिक्रिया या निर्णयानंतर व्यक्त झाल्या. परजिल्ह्यात अडकलेल्या लोकांची मानसिकता लक्षात घेतली जावी. ते तिकडे अस्वस्थ आणि हतबल आहेत, कधी एकदा गाव जवळ करु असा प्रश्न त्यांना सतावत आहे अशावेळी त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
Leave a comment