बीड । वार्ताहर
गेल्या 45 दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्यातील दिव्यांगांना कोणतीही अडचण येवू नये म्हणून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यपातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन केला. यामुळे राज्यातील 25 हजारांपेक्षा जास्त दिव्यांगांना घरपोहच सेवा उपलब्ध झाली आहे. यामुळे दिव्यांगांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या 45 दिवसांपासून लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे सर्वसामान्यांबरोबरच दिव्यांगांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा विचार करुन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिव्यांग आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण कक्ष स्थापन करुन राज्यातील दिव्यांगांना येणार्या अडचणी ऑनलाईन पध्दतीने संकलित करण्याची सूचना केली. त्यानुसार शुक्रवारपर्यंत राज्यातील 25 हजार दिव्यांगांना दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत प्रत्यक्ष घरपोहच लाभ देण्यात आले. यामध्ये दिव्यांगांना दैनंदिन वापराचे साहित्य, मास्क, सॅनिटायझर याबरोबरच त्यांची शासकीय कार्यालयातील कामेही दिव्यांग दुतांमार्फत पूर्ण करण्यात आली. त्यामुळे राज्यातील दिव्यांगांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि यंत्रणेचे आभार मानले आहेत.
जिल्हानिहाय वाटप झालेली मदत
कोल्हापूर- 1200, सांगली-750, जळगाव-550, वर्धा-336, चंद्रपूर-374, बुलढाणा-595, लातूर-936, गोंदिया-184, बीड-1271, जालना-962, अहमदनगर-1005, रायगड-362, औरंगाबाद-1570, रत्नागिरी-1115, नागपूर-1593, ठाणे-1051, अमरावती-1159, यवतमाळ-260, वाशिम-162, धुळे-825, नाशिक, 517, पुणे,1784, पालघर-331, उस्मानाबाद-556, गडचिरोली-58, नंदूरबार, परभणी प्रत्येकी 181, सातारा-227, सोलापूर-381 व नांदेड 293
Leave a comment