बीड । वार्ताहर
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून बुधवारी (दि.6) सकाळी 11 तर केज उपजिल्हा रुग्णालयातून 1 अशा एकुण 12 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. रात्री 10.30 वाजता यातील 8 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले तर उर्वरित 4 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, लवकरच ते प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. आता या 4 अहवालाकडे आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बुधवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात 11 जणांचे तसेच केज उपजिल्हा रुग्णालयातून पहिल्यांदाच एका संशयिताचा स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. यातील 8 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले तर उर्वरित 4 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. सध्या जिल्ह्यात 62 जण होम क्वॉरंटाईन तर 121 जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत 40 हजार 372 मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी सांगीतले. बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. आष्टी तालुक्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्यावर नगर येथे उपचार करण्यात आले. त्या रुग्णाने कोरोनाशी यशस्वी लढा दिला. त्यानंतर त्याचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यामुळे आता संबंधित व्यक्ती मूळगावी परतला आहे. बीड जिल्ह्यात आजपर्यंत तपासलेल्या 236 पैकी 232 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. आजच्या चार अहवालांची प्रतीक्षा आहे. दरम्यान जिल्हा प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
Leave a comment