मुंबई । वार्ताहर
राज्यातले सरकार टिकवण्यासाठी महत्त्वाची असलेली विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह आहेत. उद्धव ठाकरे यांना दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडी निवडणूक बिनविरोध करेल, अशी चर्चा होती. पण काँग्रेसने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आग्रह धरल्यामुळे महाविकास आघाडीचे मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेसाठी ९ जागांकरिता २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. पण नऊ जागांसाठी फक्त नऊ उमेदवार उभे असतील तर निवड बिनविरोध जाहीर होईल आणि निवडणूक घ्यावी लागणार नाही. सध्याचे पक्षीय बलाबल बघता विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेसला २, काँग्रेसला १ आणि भाजपाला ४ अशा जागा मिळण्याची शक्यता जास्त आहे. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी १ ऐवजी २ जागा लढवण्याची भूमिका घेतली आहे.
महाविकास आघाडीकडे ६ जागा लढवून आणि जिंकून येण्याची क्षमता आहे. या क्षमतेमुळे आम्ही निवडणूक लढवून जिंकू आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर कायम राहतील असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. काँग्रेस विधान परिषदेच्या २ जागा लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
...म्हणून उद्धव ठाकरेंच्या बिनविरोध निवडीचा मार्ग बंद
महाविकास आघाडीच्या निर्णयामुळे ९ जागांसाठी निवडणूक रिंगणात १० उमेदवार उतरण्याची शक्यता आहे. जागांपेक्षा जास्त उमेदवार असल्यास ठरल्याप्रमाणे २१ मे रोजी निवडणूक घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षावर आपले सर्व उमेदवार निवडणून आणण्याचा दबाव राहणार आहे.
याआधी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रयत्न करत होते. पण काँग्रेसने आपली भूमिका कायम ठेवली. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बैठक झाली. या बैठकीत बिनविरोध निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा प्रयत्न केले. हे प्रयत्न निष्फळ ठरले.
विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकीसाठी हेमंत टकले, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर या नावांची चर्चा आहे तर काँग्रेसमध्ये मोहन जोशी, माणिकराव ठाकरे , नसिम खान, मुजप्फर हुसेन यांच्या नावांची चर्चा आहे.
रूपाली चाकणकर, आदिती नलावडे यांची वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे यांनी ताकद पणाला लावल्याची चर्चा आहे तर अजित पवार हे अमोल मिटकरी, नजीम मुल्ला यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत.
शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित आहेत. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर पाठिंबा दर्शवण्यासाठी सह्या केल्याचे वृत्त आहे. लवकरच उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे उमेदवारी अर्ज सादर करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांसाठी स्वतःचा विजय महत्त्वाचा!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या दोनपैकी एकाही सभागृहाचे सदस्य नसल्याने सहा महिन्यांच्या कालावधीत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे त्यांना बंधनकारक आहे. त्यानुसार कोणत्याही परिस्थितीत विधान परिषदेचा आमदार होणे उद्धव ठाकरेंसाठी अत्यावश्यक आहे.
Leave a comment