लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात झोननिहाय निर्बंध लावण्यात आले आहेत, त्यात राज्यभरात काही ठिकाणी काही गोष्टी सुरू झाल्या आहेत.
राज्य सरकारने काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत दिलेल्या यादीत मोलकरणीचा समावेश नसल्याने त्या घरकामारसाठी जाऊ शकतात की नाही, याबाबत जरा संभ्रम आहे.
पण कंटेनमेंट (प्रतिबंधित) झोन वगळता इतर ठिकाणी घरकामासाठी जाण्याकरिता मोलकरणींना परवानगीची आवश्यकता नाही, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
कोरोना नियंत्रक कक्षाचे मुख्य समन्वयक आणि IAS अधिकारी भूषण गगराणी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना यासंबंधी नियम स्पष्ट केले. ते म्हणाले, "कंटेनमेंट (प्रतिबंधित) क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणी मोलकरणीला कामावर जाण्यासाठी परवागनीची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ, मुंबई शहर रेड झोनमध्ये आहे, पण मुंबईतील धारावी, वरळी हे भाग कंटेनमेंट (प्रतिबंधित) क्षेत्रात येतात. अशा ठिकाणी कुणालाही जाण्याची अथवा येण्याची परवानगी नाही. त्यामुळे कंटेनमेंट परिसर वगळून इतर झोन्समध्ये मोलकरीण कामासाठी जाऊ शकते.
मोलकरणीला प्रवासासाठी विशेष सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पायी जाण्याचा पर्याय आहे. दुचाकी वाहनांवर दोन जणांना परवानगी नाही. त्यामुळे मोलकरीण स्वत: चालक असेल तर दुचाकी वाहनाने प्रवास करू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Leave a comment