स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड । वार्ताहर
कचरा गोळा करणार्या तीन महिलांनीच जिल्हाधिकारी कार्यालयतील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या बॅटर्यांची चोरी केल्याचे उघड झाले आहे.बॅटर्या चोरणार्या तीन महिला आणि त्या खरेदी करणारा भंगार दुकानदारास पोलीसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे.
विजयमाला डिगांबर लोंढे (40) संगीता गंगाधर काळे (35) जयश्री नामदेव रोकडे (40, सर्व प्रकाश आबेडकर नगर, इमामपुर रोड, बीड) अशी अटक करण्यात आलेल्या तीन बॅटर्या चोरणार्या महिलांची नावे आहेत. तर या चोरीच्या बॅटर्या खरेदी करणारा भंगार दुकानदार शेख जाफर बाबामिया यासही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या 85 बॅटर्या ज्याची किंमत 8 लाख 10 हजार इतकी आहे. या बॅटर्या चोरी गेल्याचा गुन्हा शिवाजी नगर ठाण्यात दाखल आहे. बॅटरी चोरीची येथील दुसरी वेळ आहे. याचा तपास करत गुन्हे शाखेने चोरट्यांचा शोध लावण्यात यश मिळाले. कचरा गोळा करणार्या तीन महिलांनी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या बॅटरीची पाहणी केली, नंतर कचरा गोळा करण्याचे निमित्त करुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसर्या मजल्यावर प्रवेश करत तेथील बॅटर्या असलेल्या रुमच्या खिडकीतून आतमध्ये जावून तेथील बॅटर्या खाली फेकून पहाटेच्या सुमारास वॉचमन नसल्याची संधी साधून मिळेल त्या वाहनाने चोरुन नेल्या अशी कबुली आरोपी महिलांनी चौकशीदरम्यान पोलीसांना दिली. दरम्यान या आरोपींकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येतील असा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत, पोलिस उपनिरीक्षक संतोष जोंधळे, पोलिस कर्मचारी तुळजीराम जगताप, बालाजी दराडे, भास्कर केंद्रे, नसीर शेख, अन्वर शेख, जयश्री नरवडे, सोनाली जाधवर, कोमल नाईकवाडे, राजू वंजारे यांनी केली.
Leave a comment