मुंबई । वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्य सरकारच्या कामकाजावर बोलताना सगळं काही बरोबर चाललं आहे असं दिसत नसल्याचंही म्हटलं आहे. ABP माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्दतीसंबंधी विचारण्यात आलं.
राज ठाकरे यावेळी म्हणाले की, "सुरुवातीच्या वेळी काही गोष्टी मी त्यांना सुचवल्या. त्यातल्या काही गोष्टी झाल्या तर काही झाल्या नाहीत. नंतर काही गोष्टी करायला घेतल्या पण उशीर झाला होता. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे याआधी अशी परिस्थिती कोणासमोर आली नव्हती. त्यामुळे राज्य किंवा केंद्र सरकारला काय करायचं हे कळत नव्हतं. पण आता ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या होताना दिसत नाही. आपण नोकरशाहीवर किती अवलंबून राहत आहोत याचा विचार झाला पाहिजे".
"एक अधिकारी वेगळं सागंत आहे. दुसरा वेगळं सागंतोय. मी काही मंत्र्यांशी बोललो तेव्हा ते म्हणतात तुम्हीच उद्धव ठाकरेंशी बोला, मुख्य सचिवांशी बोला. हे काही बरोबर चाललं आहे असं दिसत नाही. सगळे बसून निर्णय घेत आहेत आणि नंतर लोकांपुढे येत आहेत असं मला तरी दिसत नाहीये. असं भासवण्याचा प्रयत्न होत आहे, पण तसं दिसत नाही," असंही राज ठाकरे म्हणाले.
"रमजानला रस्ते भरले होते, असं कसं करुन चालेल. त्यांच्या सणांसाठी लोक रस्त्यात येणार आणि आपले लोक आले की त्यांना बाबूं मारणार हे काही बरोबर नाही. ज्यावेळी असं संकट येतं तेव्हा सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. आपल्या लोकांनी घरात सण साजरे केले, आंबेडकर जयंतीला आमच्या बांधवांनी घराची थांबून जयंती साजरी केली. मगा अशा गोष्टी का होत आहेत ? कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे," असं यावेळी राज ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता कठोर निर्णय घेतले पाहिजे. नोकरशाहीवर किती अवलंबून राहणार. नोकरशाहीने सगळी मदत करणे अपेक्षितही नाही. महाराष्ट्रात काय घडत आहे याचा अंदाज घेणं आणि लोकांना सांगणं गरजेचं आहे. दोन तास काय दुकानं उघडी ठेवताय, पूर्ण दिवस ठेवा ना. झुंबड झाली की नियमांचं पालन होत नाही म्हणतात. हा कुठला थिल्लरपणा आहे. सुरुवातीला काही गोष्टी बऱ्य़ा वाटल्या पण आता ठाम निर्णय घेणं गरजेचं आहे. लॉकडाउन कधी आणि कसं काढणार हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांनी यावं असंच काही नाही इतरजण येऊनही सांगू शकतात," असंही राज ठाकरे म्हणाले.
Leave a comment