कोरोनाच्या दहशतीमुळे चैत्रीवारीचा सोहळा रद्द करावा लागला. आता येत्या 1 जुलै रोजी आषाढीवारीचा महासोहळा आहे. कोरोनाच्या महामारीतून संपूर्ण देश अद्यापही सावरला नसल्याने, आषाढीवारीचा सोहळा करावा की न करावा याबाबत वारकरी संप्रदायासमोर पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडवण्यासाठी 3 मे रोजी राज्यभरातील पालखी सोहळा प्रमुख आणि महाराज मंडळीच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीत आषाढी वारीबाबत सर्वानुमते निर्णय घेतला जाईल अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी बोलताना दिली.
आषाढीवारी म्हणजे पंढरपूरमध्ये भरणारी सर्वात मोठी यात्रा. 12 ते 15 लाख वारकरी भाविकांची या सोहळ्यासाठी उपस्थिती असते. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यातून भाविकांची वर्दळ असते. परंतु अद्यापही कोरोनाचे सावट कमी झालेले नसल्याने 3 मे चा लॉकडाऊन 17 मे पर्यत वाढण्यात आला आहे.
आषाढी वारीचा सोहळा भरवायचा असेल तर प्रशासनाला आणि वारकऱ्यांना दोन महिन्यांपासून नियोजन करावे लागते. त्यामुळे वारकरी संप्रदायात आणि व्यापाऱ्यांमध्ये वारी भरणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी 3 मे रोजी ऑनलाईन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पालखी सोहळा प्रमुख, दिंडी प्रमुख, मान्यवर महाराज मंडळी आदींचा समावेश असणार आहे. या सर्वांशी सविस्तर चर्चा करुन आषाढी वारीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे नियोजित प्रस्थान 28 मे रोजी, श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे नियोजित प्रस्थान 12 जून रोजी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे नियोजित प्रस्थान 13 जून रोजी आहे. हे नियोजन परंपरागत असते असते तथापि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र जमा करायचे का करायचे असतील तर प्रशासन परवानगी देणार का असे नानाविध प्रश्न वारकरी संप्रदाय समोर उभा ठाकले आहेत. सर्व मान्यवरांशी सविस्तरपणे चर्चा करुन 3 मे रोजी यावर साधकबाधक तोडगा निघेल असा विश्वास जळगावकर यांनी व्यक्त केला.
Leave a comment