बीड । वार्ताहर
केंद्र सरकाकडून आरोग्य विभागाचे सचिव यांनी देशातील झोन नुसार जिल्ह्यांची यादी गुरुवारी जाहीर केली. या यादीत बीड जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. महत्वाचे हे की, बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ आष्टी तालुक्यात 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता.त्याच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार झाले. नंतर त्याचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तो सुखरुप मूळगावी परतला आहे. त्यामुळे बीड जिल्हा कोरोनामुक्त ठरला असून जिल्हावासियांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे.
आज जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये, 16 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर 6 जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. रेड, ऑरेंज व ग्रीन झोन क्षेत्रात लॉकडाऊन संदर्भातील नियमावली येत्या 3 मे रोजी घोषित केले जाईल. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बीड जिल्ह्यात सुरुवातीपासूनच जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली.जिल्ह्याच्या सर्व सीमा वेळीच बंद करण्यात आल्या. परजिल्ह्यातील कोणत्याही नागरिकास जिल्ह्यात प्रवेश दिला नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा कोणीही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही.आतापर्यंत तपासलेले 204 स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह ठरलेले आहेत. यात 14 जणांचे स्वॅब दुसर्यांदा निगेटिव्ह आलेले आहेत. जिल्ह्यात जमावबंदी, संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. आरोग्य यंत्रणेकडून घरोघरी जावून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
आता येत्या रविवारी (दि.3) पहिल्या व दुसर्या टप्प्यातील लॉकडाऊन लागू करून 40 दिवस पूर्ण होणार आहेत. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून लॉकडाऊन शिथिल केल्यास कोरोनाच्या संसर्गाची भीती अशा दुहेरी संकटात देश सापडला आहे.या समस्येतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये वर्गीकरण करून त्याची यादी आज (1 मे) सकाळी प्रसिद्ध केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील जिल्ह्यांचाही समावेश तीन वेगवेगळ्या झोनमध्ये करण्यात आली असून यात बीड जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आली आहे.
केंद्रीय गृह सचिव प्रीती सुडान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन देशभरातील जिल्ह्यांचे वर्गीकरण रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये करण्यात आले आहे. प्रत्येक राज्याने त्यानुसार रेड आणि ऑरेंज झोनच्या क्षेत्रात कंटेनमेंट झोन आणि बफर झोनच्या हद्दी निश्चित करून केंद्र शासनाला सूचित करावे. कोणत्याही जिल्ह्याला तोपर्यंत ग्रीन झोन मानण्यात येणार नाही जोपर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सलग 21 दिवस नव्याने कोरोनाने बाधित झाल्याचे एकही केस नसेल. सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये देशभरातील 130 जिल्हे रेड झोनमध्ये, 284 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर 319 जिल्हे ग्रीन झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. रेड किंवा ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्र व तालुका क्षेत्र अशी विभागणी करून ज्या ठिकाणी मागील 21 दिवसात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसेल अशा ठिकाणी झोनचा दर्जा कमी करता येईल.
झोन व त्यात समाविष्ट जिल्हे
रेड झोन :
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, पालघर, यवतमाळ, धुळे, अकोला आणि जळगाव
ऑरेंज झोन :
बीड, रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा
ग्रीन झोन :
उस्मानाबाद, वाशीम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचीरोली आणि वर्धा
Leave a comment