औरंगाबाद । वार्ताहर
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील रुग्ण संख्येतही सलग चार दिवसांपासून मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. शहरात आणखी 21 रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या 151वर पोहचली आहे. तर, नांदडेमध्ये करोनाने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे अगोदरच रेड झोनमध्ये समावेश असललेल्या औरंगाबाद शहाराचा प्रवास आता करोनाच्या हॉटस्पॉटकडे चालल्याचे दिसत आहे. आतापर्यंत शहरात 7 जणांचा करोनाने बळी घेतला असून 23 जणांना रुग्णालयातूून सुट्टी देण्यात आलेली आहे.
शहरातील ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे, त्या भागात टाळेबंदी अधिक कडक करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या आहेत. जिल्हा रुग्णालय, तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अडचणींबाबतही त्यांनी चर्चा केलेली आहे. त्यांच्याकडे पीपीई कीटची मागणी अधिकाऱ्यांनी नोंदवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Leave a comment