गेवराई । वार्ताहर
संचारबंदी असतानाही वाळूची चोरटी वाहतूक आणि अवैध उत्खनन लपून राहिलेले नाही. असाच प्रकार गेवराई तालुक्यातील गुंतेगावात उघडकीस आला. स्वतः जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घटनास्थळी दाखल होत या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या ठिकाणाहून वाळू साठ्यासह विविध साहित्य असे तब्बल 9 लाख 26 हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करत एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विकास मच्छिंद्र गोरडे (रा. गुंतेगाव,ता.गेवराई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. चकलांबा ठाणे हद्दीतील गुंतेगाव येथे गोदावरी नदीपात्रातील एका मंदिर परिसरात 40 ते 45 ब्रास वाळूचे दहा ढिगारे करून ठेवण्यात आल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी पथकाने या ठिकाणी छापा मारला. या ठिकाणी वाळू उपसा करण्यासाठी ट्रॅक्टर, केणी फावडे हे विकास गोरडे याच्या घराच्या परिसरात आढळून आले होते. त्यामुळे वाळूचे ढिगारे हे गोरडे याने केले असल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. मालेगाव सज्जाचे तलाठी कमलेश सुरावर यांच्या तक्रारीवरून बुधवारी चकलंबा ठाण्यात विकास गोरडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या कारवाईमुळे गोदाकाठी वाळूचे उत्खनन करणार्या माफियांमध्ये एकच खळबळ उडाली.
Leave a comment