अंबाजोगाईत 1 लाखाची दारुची चोरी
अंभोर्यासह बीडमध्ये साडेतीन लाखांचा ऐवज लांबवला
बीड-अंबाजोगाई । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू असतानाही जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच आहे. घरफोडीसह दारू आणि बिअरबार परमिटरूममध्ये चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत.अशाच घटना अंबाजोगाई, बीड आणि आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे उघडकीस आल्या आहेत.अंबाजोगाईत एक लाख 11 हजारांच्या दारूची तर अंभोरा येथे शेतकर्याचे घर फोडून तब्बल 3 लाख 18 हजारांचा ऐवज लंपास केला गेला.बीडमध्येही 34 हजारांचा ऐवज चोरट्याने लांबवला
अंबाजोगाई शहरात हंसराज देशमुख यांचे पोखरी रस्त्यावर बिअरबार परमिटरूम आहे. याठिकाणी 28 ते 29 एप्रिलच्या मध्यरात्री चोरट्यांनी बियरबारचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. आतमधील विविध कंपनीच्या दारू व बिअरच्या बाटल्या असा एकूण 1 लाख 11 हजार 378 रुपयांचा माल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हंसराज देशमुख यांनी शहर ठाण्यात तक्रार नोंदवली. यावरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक दहिफळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
चोरीची दुसरी घटना अंभोरा (ता.आष्टी) येथील वडाचा मळा परिसरात बुधवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास घडली. येथील शेतकरी शंकर सयाजी खाकाळ यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 1 लाख 26 हजार 875 रु.किमंतीचे 5 तोळे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व 1 लाख 92 हजारांची नगदी रक्कम असा एकुण 3 लाख 18 हजार 875 रुपयांचा ऐवज लंपास केला. अंभोरा ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक लोखंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बीडमध्येही चोरी
शहरातील पेठ बीड भागातील आमेर कॉलनीत राहणार्या महंमद खालिद मोहम्मद युनुस यांच्या घरात शिरलेल्या चोरट्याने दहा हजाराची रक्कम, 3 मोबाईल व काही सोन्या चांदीच्या वस्तू असा 34 हजार 700 रुपयांचा ऐवज हातोहात लंपास केला.चोरीची ही घटना बुधवारी (दि.29) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. महंमद खालिद मोहम्मद युनुस यांनी ठाण्यात तक्रार नोंदवली.त्यानुसार अज्ञाताविरुद्ध पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Leave a comment