नवीदिल्ली । वृत्तसेवा 

केंद्र सरकारनं स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपापल्या राज्यांमध्ये जाता यावे यासाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यामुळे देशात विविध ठिकाणी अडकलेले मजूर, पर्यटक, विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांचा आपापल्या घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. परंतु, आपल्या घरी पोहचण्यासाठी नागरिकांनी योग्य मार्गाचा अवलंब करायला हवा. नागरिकांनो आपल्या घरी परतण्याची घाई करू नका.अगोदर हे मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपल्या सध्याच्या घरातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 

सर्वात अगोदर हे समजून घ्या की केंद्रानं या सूचना राज्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे, केंद्रानं अडकलेल्या नागरिकांना कुठेही येण्या-जाण्याची परवानगी दिलेली नाही. तर ही परवानगी देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापल्या नागरिाकांना पाठवण्यासाठी किंवा आणण्यासाठी परवानगी देण्यात आलीय. याचाच अर्थ, तुम्ही अडकला असाल तरीदेखील स्वत: आपल्या घराकडे परतण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही. तर राज्य सरकारांद्वारे ही व्यवस्था तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या राज्यातून इतर राज्यांत कामाच्या किंवा शिक्षणाच्या निमित्तानं परराज्यात गेलेल्या आणि लॉकडाऊनमुळे या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना केंद्र सरकारच्या या आदेशामुळे आपल्या घरी परतता येणार आहे. यासाठी राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांनी ’नोडल प्राधिकरणा’ची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या राज्यातून बाहेर परराज्यात अडकला असाल तर आपल्या राज्याकडून पाठवण्यात येणार्‍या बसची तुम्हाला वाट पाहावी लागेल.तुमच्या मूळ राज्यातील सरकारनं तुमच्या सध्याच्या ठिकाणी बस पाठवण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला तुमच्या नजिकच्या नोडल अधिकार्‍यांची माहिती मिळवावी लागेल. त्यांच्याकडे तुम्ही घरी जाण्यासाठी आपलं आणि कुटुंबीयांचं रजिस्ट्रेशन करू शकाल. प्रवासासाठी वापरण्यात येणार्‍या बसमध्येही तुम्हाला सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं लागेल. तसंच मास्कचाही तुम्हाला वापर करायचा आहे. प्रवासा दरम्यान तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कापासून दूर राहण्याची काळजी स्वत:च घ्यायची आहे.

तुम्हाला कोविड 19 ची कोणतीही लक्षणं जाणवत नसतील तर आणि तरच तुम्हाला प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. यासाठी गाडीतून प्रवास करणार्‍या प्रत्येक नागरिकाची स्क्रिनिंगही पार पडणार आहे. जेव्हा तुम्ही तुमचं नाव रजिस्टर केल्यानंतरच तुमची चाचणी पार पडू शकेल. या चाचणीत प्रकृती उत्तम असलेल्या नागरिकांनाच आपल्या घरी परतण्यासाठी राज्य सरकारकडून धाडण्यात आलेल्या बसमध्ये चढण्याची परवानगी मिळेल. बसमधून उतरल्यानंतर एखाद्या नागरिकाची तब्येत बिघडल्याचं लक्षात आलं तर त्याची रवानगी थेट रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात करण्यात येईल. सर्व रुग्णांना आणि संशयित रुग्णांना आरोग्य सेतू हे अ‍ॅप वापरावे लागेल. याद्वारे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल

आपल्या घरी परतल्यानंतरही लगेचच तुम्हाला तुमच्या आप्तेष्टांच्या भेटी-गाठी घेता येतील, असं अजिबात समजू नका. बसमधून उतरताच आरोग्य अधिकारी तुमची पुन्हा एकदा तपासणी करणार आहेत. सर्व काही ठीक वाटलं तरीदेखील तुम्हाला काही दिवसांसाठी होम क्वारंटाईन राहण्यास सांगितलं जाईल. यावेळी, तुम्हाला तुमच्या घरी तर राहायचं आहे परंतु, कुटुंबीयांच्या जवळ मात्र आपण जाणार नाही, याची काळजी घ्यायचीय. यामुळे त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे.

वाहतूक केवळ बसमधूनच

नागरिकांची वाहतूक केवळ बसच्या साहाय्यानं केली जाईल. यासाठी आपल्या नागरिकांना आणण्यासाठी राज्य किंवा ज्या राज्यात नागरिक अडकले असतील ती राज्य बस उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करतील. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू होणार नाही. त्यामुळे नागरिकांना केवळ बस आणि त्यादेखील राज्य सरकारकडून व्यवस्था करण्यात आलेल्या बसवरच अवलंबून राहावं लागणार आहे. ज्या दोन राज्यांमध्ये हे नागरिक स्थलांतर करणार आहेत, तेथील अधिकारी एकमेकांशी संपर्कात असतील आणि लोक हा प्रवास कसा करतील? याबाबत निश्चित मार्ग काढतील.

-------

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.