वाढते तापमान अन् बाष्पीभवनामुळे पाणीसाठा आटू लागला
बीड । सुशील देशमुख
गोदावरी आणि कृष्णा खोरे अंतर्गत बीड जिल्ह्यात एकुण 144 प्रकल्प आहेत. गतवर्षी पावसाळ्यात अखेरच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढला होता तर काही प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले होते. मात्र आता एप्रिल महिन्याच्या अखेरीस वाढत जाणारे तापमान आणि वेगाने होत असलेले बाष्पीभवन यामुळे प्रकल्पीय पाणीसाठा आटू लागला आहे. 24 एप्रिल अखेर जिल्ह्यातील 34 प्रकल्प कोरडे पडले तर 35 प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.जिल्ह्यातील सर्व 144 प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 221.824 द.ल.घ.मी. म्हणजेच 24.87 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
बीड जिल्ह्यात माजलगाव आणि केज तालुक्यातील मांजरा हे दोन मोठे प्रकल्प आहेत तर गोदावरी खोरे अंतर्गत 10 आणि कृष्णा खोरे अंतर्गत 6 असे एकूण 16 मध्यम प्रकल्प आहेत, तर गोदावरी खोरे अंतर्गत 99 व कृष्णा खोरे अंतर्गत 27 असे 126 लघू प्रकल्प आहेत. सध्या माजलगाव प्रकल्पामध्ये 148.400 द.ल.घ.मी. इतका म्हणजेच 47.56 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. असे असतानाच मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा मात्र कमी झाला आहे. सद्यस्थितीत मांजरामध्ये केवळ 20.843 द.ल.घ.मी. म्हणजेच 11.78 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या तुलनेत 16 मध्यम प्रकल्पाची पाणी तपासणी जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून केली गेली.
या सर्व मध्यम प्रकल्पांमध्ये 42.626 द.ल.घ.मी. म्हणजेच 28.14 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच जिल्ह्यातील 126 लघू प्रकल्पांमध्ये 51.641 द.ल.घ.मी. इतके पाणी असून त्याची टक्केवारी 20.53 इतकी आहे. दरम्यान काही मध्यम व लघूप्रकल्प कोरडे पडलेले आहेत. एप्रिल आणि मे मध्ये जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत तर कधी 42 अंशापर्यंत पोहोचतो, शिवाय वाढत्या बाष्पीभवनामुळेही पाणीसाठा आटत असल्याचे सांगितले जाते.
प्रकल्पीय पाणीसाठ्याची टक्केवारी
सध्या बीड जिल्ह्यात एकही प्रकल्प पुर्ण क्षमतेने म्हणजेच 100 टक्के भरलेला नाही. केवळ एक लघूप्रकल्प 75 टक्के पाण्याने व्यापलेला आहे. याशिवाय 3 मध्यम व 13 लघु अशा एकूण 16 प्रकल्पांमध्ये 50 ते 75 टक्क्यादरम्यान पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात 25 ते 50 टक्के पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांची संख्या 30 इतकी असून यात माजलगाव या मोठया प्रकल्पासह 26 लघू आणि दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. तर 26 लघू व 2 मध्यम अशा एकूण 28 प्रकल्पांमध्ये 25 टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील 35 प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून यात केजच्या मांजरा प्रकल्पासह 4 मध्यम आणि 30 लघू प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. दर आठवड्यात गुरूवारी साप्ताहिक प्रकल्पीय पाणीसाठ्याची मोजणी या विभागाकडून केली जाते.
Comments (1)
जल संवर्धन काळाची गरज आहे....
सुशील, छान बातमी केली
Leave a comment