महाराष्ट्राच्या पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्याच्या घटनेनंतर काही दिवसांतच उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एका मंदिरात दोन साधूंची हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती. एकीकडे या मुद्द्याची चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. पालघर घटनेवरून राजकारण करू नका अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना टोला लगावल्यानंतर आता आदित्यनाथ यांनी थेट शिवसेनेला ‘तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, उत्तर प्रदेशची चिंता करू नका’, अशा शब्दांत सुनावलं आहे.

नक्की घडलंय काय?

१६ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या पालघरमध्ये सीमावर्ती आदिवासी भागात दोन साधूंना जमावाने बाळ चोरीच्या संशयावरून मारहाण करून त्यांचा जीव घेतला. या घटनेने राज्यात खळबळ माजली. या प्रकरणी ११० लोकांना लागलीच ताब्यात देखील घेण्यात आलं. त्यात ९ प्रमुख आरोपींचा समावेश होता. या घटनेवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून या घटनेवर काळजी व्यक्त केली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा देखील केली होती.

यानंतर सोमवारी म्हणजेच २७ एप्रिल रोजी रात्री उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर भागामध्ये एका व्यक्तीने मंदिरातल्या दोन साधूंची हत्या केली. त्यांनी काही दिवस आधी हल्लेखोराला चिमटा चोरताना पकडलं होतं. त्याच्या रागातून त्याने दोघा साधूंची हत्या केली. या घटनेवरून संजय राऊत यांनी २८ एप्रिलला सकाळी केलेल्या ट्वीटवरून चर्चा सुरू झाली. ‘भयानक! उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एका मंदिरात दोन साधुंची हत्या करण्यात आली आहे. पण मी सगळ्यांना आवाहन करतो की कुणीही या घटनेला धार्मिक किंवा सामाजिक रंग देऊ नये, ज्या पद्धतीने काही लोकांनी पालघर प्रकरणात तसा प्रयत्न केला’, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं.

संजय राऊतांच्या या ट्वीटचा निशाणा थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लागला. २८ एप्रिललाच रात्री उशिरा योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवरून संजय राऊतांना उत्तर देण्यात आलं. ‘श्री. संजय राऊत जी, संतांच्या निर्घृण हत्येवर चिंता व्यक्त करणं राजकारण वाटतंय का? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला कारण पालघरमधे मारले गेलेले साधू निर्मोही आखाडाशी संबंधित होते. विचार करा राजकारण कोण करत आहे! याला राजकारण म्हणणाऱ्या आपल्या वैचारिक (कु)दृष्टीला काय म्हणावं? कुसंस्कारांमध्ये रक्तस्नान करणारी तुमची ही टीका तुमच्या बदललेल्या राजकीय संस्कारांचा दाखला आहे. ही तेढ वाढवण्याची सुरुवात आहे, यात शंका नाही’, असं ट्वीट योगी आदित्यनाथ यांनी केलं.

…महाराष्ट्र सांभाळा!

दरम्यान, यावेळी ट्वीटमध्ये योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेलाच इशारा दिला आहे. ‘उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. इथे कायदा तोडणाऱ्यांना सक्तीने शिक्षा केली जाते. बुलंदशहरमधल्या घटनेमध्ये तातडीने कारवाई करण्यात आली. काही तासांमध्येच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तुम्ही महाराष्ट्रा सांभाळा, उत्तर प्रदेशची चिंता करू नका’, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.