नगर । वार्ताहर
करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मशिदी बंद आहेत. मात्र, रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास सुरू करण्यासाठी व सोडण्यासाठी पहाटे आणि सायंकाळी दोन वेळच्या अजानला मुभा मिळण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात येत होती. या मागणीला प्रतिसाद देत जिल्हा पोलीस दलाने शहरातील 23 मशिदींमध्ये उपवास सोडण्याच्या वेळेस संध्याकाळी मगरीब नमाजच्या वेळी एकदा आजान देण्याची परवानगी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिली आहे.
रमजानच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.28) रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात बैठक झाली.
पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारून मुलाणी, मन्सूर शेख, करीम हुंडेकरी, उबेद शेख, शौकत यांनी आजानचा विषय पोलीस प्रशासनासमोर स्पष्ट करुन, मशिदीत सामुदायिक नमाज होणार नसल्याची भूमिका मांडली. बैठकीत पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये शहरातील मुस्लिमबहुल भागातील 23 मशिदींमध्ये अजान देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यामध्ये बक्कर कसाब मशिद (शनिचौक), पटवेकर मशिद (जुना बाजार), यतिमखाना मशिद (जुनी मनपा चौक), सुन्नी कुरेशी मशिद (बेपारी मोहल्ला), कारी मशिद (बाबा बंगाली झेंडीगेट), जलाली मशिद (कामाठीपुरा ईदगाह मैदान), सैदू कारंजा मशिद (झेंडीगेट), बारामासी मशिद (हातमपुरा), मोहंमदी मशिद (तांबटकर गल्ली), लालमिस्त्री मशिद (बेलदार गल्ली), शमशेर बाजार मशिद (सर्जेपूरा), हुसेनी मशिद (कोठला), तांबोली कब्रस्तान मशिद (रामवाडी), कवीजंग नगर मशिद (कवीजंग नगर), नुरानी मशिद (बोल्हेगाव), नुरानी मशिद (अप्पू हत्ती चौक लालटाकी), बडी मशिद, आयेशा मशिद, छोटी मरियम मशिद, बडी मरियम मशिद, दर्गा दायरा मशिद (मुकुंदनगर), मोमीनपूरा मशिद (भिंगार), आलमगीर मशिद (आलमगीर) या मशिदींचा समावेश आहे.
या मशिदी व्यतिरिक्त कोणत्याही मशिदीमधून आजान न देण्याचे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे. पोलीस प्रशासनाने सहकार्य करुन एक वेळच्या आजानची दिलेल्या परवानगीचे मुस्लिम समाजाने स्वागत केले आहे.
Leave a comment