हिंगोली । वार्ताहर
जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आल्याने तसेच एका व्यक्तीला कोरोना ग्रस्ताच्या संपर्कातून बाधा झाल्यामुळे हिंगोली शहरासह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ व दुकाने 3 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. परवानगीशिवाय घराबाहेर पडल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याचा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
हिंगोली शहरासह जिल्ह्यात 20 एप्रिल पासून ते 2 मे पर्यंत किराणा दुकाने, भाजीपाला विक्रीची दुकाने, स्वीटमार्ट, बेकरी, दुध विक्री केंद्र, परवानाधारक चिकन-मटण शॉप एक दिवस आड करून सकाळी नऊ ते दुपारी एक यावेळेत सुरु ठेवण्याचे आदेश काढण्यात आले होते. तसेच 21 एप्रिल रोजी जिल्ह्यातील खते व बियाणे विक्रीची दुकाने, कृषी सेवा केंद्र, कृषीविषयक औजारांच्या दुरुस्तीची दुकाने एकदिवस आड सुरु ठेवण्याची तर 24 एप्रिल रोजी जिल्ह्यातील स्टेशनरी, इलेक्ट्रीकल्स दुकाने सुरु करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली होती. यासोबतच जिल्हयातील टंचाई परिस्थितीमुळे बोअरवेल मशीन सुरु करण्याबाबत परवानगी देण्यात आली होती. मात्र, आज 28 एप्रिल रोजी म्हणजेच मंगळवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नव्याने आदेश काढुन यापुर्वीचे दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश रद्द करत 3 मे पर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तुच्या दुकानासह सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.हिंगोली जिल्हयात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सेनगाव तालुक्यात आज मंगळवारी एका नव्या रुग्णाची भर पडून कोरोनाचे 14 रुग्ण झाले आहेत. दरम्यान, आज मंगळवारी परवानगी असल्याने सुरू झालेल्या भाजीपाला व किराणा दुकानांवर मोठी गर्दी दिसून आली होती. त्यामुळे सर्व दुकाने 3 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी काढल्याचे सांगण्यात आले. हिंगोली शहरासह जिल्ह्यात सर्व दुकाने पाच दिवस अर्थात 3 मे पर्यंत बंद राहणार आहेत. 3 मे पर्यंत जिल्ह्यात परवानगी शिवाय घराबाहेर पडल्यास अथवा रस्त्यावर, गल्ली, बाजारपेठ या ठिकाणी आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कार्यवाही करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला आहे.
Leave a comment