बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. आज सोमवारी (दि.१५) सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात गत २४ तासात २७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दरम्यान बीड तालुक्यातील पिंपळनेर व नवगण राजुरी तसेच वडवणी तालुक्यातील कवडगाव महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
बीड जिल्ह्यात मागील २४ तासात २७.६ किलोमीटर इतका पाऊस झाला आहे. सर्वाधिक ५३.८ मिलिमीटर पाऊस वडवणी तालुक्यात झाला असून त्या पाठोपाठ बीड ४७.८, पाटोदा ४०.७, आष्टी ८.१, गेवराई २०.१, माजलगाव १७.१, अंबाजोगाई २८.७, केज २५.६, परळी १३.९, धारूर ३१.९ आणि शिरूरकासार तालुक्यात ३०.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.पावसामुळे शेत शिवारात पाणी साचल्याचे दिसून आले. उडीद, मूग या तिमाही पिकासाठी हा पाऊस महत्वाचा ठरला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १४३ प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प अजूनही कोरडे आहेत तर काही प्रकल्पांची पातळी जोत्याखाली गेलेली आहे. माजलगाव या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या प्रकल्पातही सध्या उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी सर्व प्रकल्प भरणे आवश्यक असून त्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.
सरासरीच्या तुलनेत ५२.१ टक्के पाऊस
बीड जिल्ह्याच्या पावसाची वार्षिक सरासरी ५६६.१ मिलिमीटर इतकी आहे. जिल्ह्यात सध्या जून ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत पडणाऱ्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत २९५ मिलिमीटर (५२.१) टक्के पाऊस झाला आहे.
या ३ मंडळात झाली अतिवृष्टी
बीड तालुक्यातील नवगण राजुरी मंडळामध्ये ८२.८ मिलिमीटर तसेच पिंपळनेर मंडळात ९४.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरिपाच्या पीक वाढीसाठीला मदत होणार आहे. वडवणी तालुक्यातील कवडगाव मंडळातही अतिवृष्टीची (६९.८ मिलिमीटर) नोंद झाली आहे.
Leave a comment