जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र झाले संरक्षित
सोयाबीनच्या पीकविम्यासाठी सर्वाधिक 6 लाख 93 हजार
565 अर्ज, त्याखालोखाल कापसासाठी 1 लाख 81 हजार अर्ज
बीड । सुशील देशमुख
यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात 100 टक्के पेरण्या जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पुर्ण झाल्या आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पेरणीसाठी आवश्यक पाऊस झाल्याने शेतकर्यांनी वेगाने पेरण्या आटोपल्या आहेत. तसेच पीकविमा भरण्यासाठी 15 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. यंदा सर्व राज्यभरात एक रुपया भरून शेतकर्यांना त्यांच्या विविध पिकांचा विमा उतरवता येईल असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 12 लाख 76 हजार 955 शेतकर्यांनी विविध पीकांच्या विम्यासाठी 12 लाख 77 हजार 48 अर्ज ऑनलाईन दाखल केले आहेत.यातून जिल्ह्यातील खरीपाचे 5 लाख 49 हजार 491 हेक्टर पीक क्षेत्र विमा संरक्षीत झाले आहे. दरम्यान दरम्यान 15 जुलै 2024 पर्यंत पिक विम्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. शेतकर्यांना 1 रुपयात पीकविमा भरता येत असला तरी राज्य शासनाने या सर्व शेतकर्यांसाठी 315 कोटी 93 लाख 8 हजार 184 रुपये भरले आहेत.
पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये एकच विमा कंपनी असणार असून इतर खाजगी विमा कंपन्या ’ऍग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी ऑफ इंडिया’शी संलग्न करण्यात येणार आहेत. खरीप हंगामाच्या सुरूवातीला एक रुपयात पीकविमा योजनेला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतकर्यांनी ऑनलाईन सेंटरवर जावून आपले अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली होती. गतवर्षी सोयाबीनचा विमा चांगला मिळाला. त्यामुळे यंदाही सोयाबीनचा पेरा कापसापेक्षा अधिक झालेला आहे. त्याबरोबरच सोयाबीनच्या पीकविम्यासाठी शेतकर्यांनी 6 लाख 93 हजार 565 अर्ज दाखल केले आहेत. यातून 3 लाख 81 हजार 938 हेक्टर क्षेत्र पीक संरक्षित झाले आहे. याबरोबरच कापसाच्या पीकविम्यासाठी 1 लाख 81 हजार 43 शेतकर्यांनी 1 लाख 81 हजार 44 अर्ज दाखल करत 66 हजार 894 हेक्टरवरील क्षेत्र संरक्षीत केले आहे. तूरीसाठी 1 लाख 35 हजार 364 पीक विमा अर्ज दाखल झाले. तसेच मूग पीक विम्यासाठी 87 हजार 181, कांद्याचा पीकविमा 68 हजार 443 शेतकर्यांनी भरला आहे. उडीद पीकविम्यासाठी जिल्ह्यातून 63 हजार 191 शेतकर्यांचे अर्ज दाखल झाले असून त्यातून 16 हजार 808 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. भूईमुगासाठी 24 हजार 572 अर्ज दाखल झाले आहेत. तर 15 हजार 804 शेतकर्यांनी बाजरीसाठी विमा भरला आहे. याबरोबरच मका पिकासाठी 7 हजार 391 शेतकर्यांनी अर्ज दाखल केले असून खरीप ज्वारी 493 शेतकर्यांनी पीक विमा भरला आहे.
पीकविम्यामुळे शेतकर्यांना मोठा आधार मिळतो. नैसर्गिक आपत्ती, कीटक आणि रोगराई यामुळे पिकांना नुकसान झाल्यास शेतकर्यांना विमा संरक्षण व आर्थिक आधार मिळतो. या योजनेअंतर्गत भरणा करण्यात येणारा प्रिमियम दर शेतकर्यांच्या फायद्यासाठी अत्यंत कमी ठेवण्यात आला असल्याने शेतकर्यांना फायदा होतो. या अंतर्गत सुमारे 90 टक्क्यांपेक्षा जास्त भार शासनाकडून उचलला जातो. शेतात पाणी साठणे, पूर येणे अशा आपत्तींना स्थानिक संकट मानप्रभावित शेतकर्यांचे सर्वेक्षण करून भरपाई किंवा दावा रक्कम दिली जाते.पीक काढण्याच्या दिवसापर्यंत जर पीक शेतातच असेल आणि त्या दरम्यान आपत्ती, वादळ, अवकाळी पाऊस आल्यास शेतकर्यांना दावा रक्कम मिळते. त्यामुळे शेतकरी पीकविमा भरण्यावर भर देताना दिसत आहेत.आजपर्यंतच्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात 12 लाख 76 हजार 955 शेतकर्यांनी विविध पीकांच्या विम्यासाठी 12 लाख 77 हजार 48 अर्ज ऑनलाईन दाखल केले आहेत.यातून जिल्ह्यातील खरीपाचे 5 लाख 49 हजार 491 हेक्टर पीक क्षेत्र विमा संरक्षीत झाले आहे. एआयसीएस विमा कंपनीचे बीड जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब इनकर यांनी ही माहिती दिली.
15 जुलैपर्यंत भरता येणार पीकविमा
बीड जिल्ह्यात 12 लाख 77 हजार शेतकर्यांनी केवळ एक रुपया भरून विविध पिकांचा विमा उतरवला आहे. दरम्यान 15 जुलै 2024 पर्यंत पिक विम्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. यामुळे ज्या शेतकर्यांनी अद्याप पिक विम्यासाठी अर्ज केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागाने शेतकर्यांना केले आहे.
Leave a comment