चोरट्यांची टोळी सक्रीय असल्याची भीती

 

 

बीड । वार्ताहर

 

बीड शहरात चोरी व घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक भागात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून नागरिक आपापल्या कॉलनीतील तरुणांना सोबत घेवून रात्रीचे जागते पहारे देवून कॉलनीत चोरी होवू नये याची  काळजी घेवू लागले आहेत. दरम्यान पोलीसांनी तातडीने चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणीही नागरिकातून होत आहे. शहरात रात्रीच्यावेळी पोलीसांची गस्त वाढवण्याची मागणी पुढे आली आहे. पोलीसांचा वचक राहिला नसल्याने खुलेआम चोरटे बीडमध्ये चोरी किंवा घरफोडीच्या उद्देशाने फिरत आहेत. यामुळे नागरिकांनी चोरट्यांची धास्ती घेतली असल्याचे चित्र आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरुन जावू नये. काही अडचण आल्यास तात्काळ डायल 112  वर संपर्क साधावा असे आवाहन शिवाजीनगर ठाणे निरीक्षक मारोती खेडकर यांनी केले आहे.

 

 

बीड शहरात सध्या बीड शहर आणि शिवाजी नगर पोलीस ठाणे  हद्दीमध्ये चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. नवनवीन शक्कल लढवून चोरांकडून देखील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. किरायाने रुम पाहिजे, एखादे जास्त परिचित असणारे आडनाव जे आडनाव कॉमन असते असे नाव घेवून दिवसा घरांची चोरटे रेकी करत असल्याचेही नागरिकातून बोलले जात आहे. या सार्‍या स्थितीत शहरातील विविध भागात सध्या नागरिकांचे आपापल्या कालनीत जागते पहारे सुरु आहेत. तरुणाचे गट रात्री कॉलनीत हाती काठी घेवून तसेच शिट्टी वाजवत सुरक्षारक्षक म्हणून काम करतांना दिसत आहे. तसेच नागरिकही कॉलनीत बैठक व्यवस्था करत रात्रभर जागता पहारा देत आहेत.

 

 

चोर येतील म्हणून सध्या शहरातील नागरिक भयभीत दिसत आहेत.  दरम्यान संशयिताची माहिती पोलीसांना द्यावी, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठलीही माहिती मिळाली तर तात्काळ पोलीसांशी 112 वर संपर्क साधावा. नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल; परंतु कोणाला अडवून कायदा हातात घेवू नका तसेच संशयितांना देखील मारहाण करु नका असे आवाहन पोलीस निरीक्षक  खेडकर यांनी केले आहे.

 

पोलीस अधीक्षकांना नागरिक,संघटनांनी दिले निवेदन

 

बीड शहरातील विविध भागातील नागरिकांकडून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे चोरट्यांचा बंदोबस्त करावा म्हणून निवेदने दिली जात आहेत. या निवेदनाची दखल घेत पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी पोलीस ठाणे निरीक्षकांना कॉलवरुन आदेश देत चोरी,घरफोडीच्या घटना रोखण्यासंदर्भात रात्रीची गस्त वाढवतानाच उशीरापर्यंत बाहेर फिरणार्‍यांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पोलीसांचे पथकही शहरात विविध भागात गस्तीवर पाठवले जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.