आरोपींकडून एटीएम, स्वाईप मशीन, मोबाईलसह लॅपटॉप केले जप्त
बीड | वार्ताहर
बीड सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने मध्य प्रदेशातील अशोकनगर येथे जाऊन मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने तब्बल 2300 किलोमीटर प्रवास करत पाच आरोपींना ताब्यात घेत अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी अनेक एटीएम कार्ड, 1 स्वाईप मशीन, 5 मोबाईल, लॅपटॉप व इतर साहित्य जप्त केले आहे.
शिवेंद्र रणवीरसिंह रघुवंशी (वय 35) व जयदीप रघुवंशी विशवीर रघुवंशी (वय 28, दोघे रा.आमरोद सिंगराणा, जि अशोकनगर मध्यप्रदेश), राजीव रामबाबू रघुवंशी (वय 32 रा. घटाब्दा, जि.अशोकनगर,मध्यप्रदेश), श्याम सीताराम रघुवंशी (वय 30 रा. ग्राममहाना, जि. अशोकनगर मध्य प्रदेश) व प्रमोद रमेशकुमार चौबे (वय 25, रा.नेहरू कॉलनी, जिल्हा अशोकनगर मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत अशी माहिती सायबर पोलीस ठाणे निरीक्षक डी.बी.गात यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर ठाणे निरीक्षक डी.बी.गात, उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, पोलीस कर्मचारी विजय घोडके, प्रदीप वायभट, रामदास गिरी, अजय जाधव यांनी केली. फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यात जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून बीड येथील एका नागरिकाची ५७ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ५ जानेवारीला गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
असा लावला गुन्ह्याचा छडा
बीड सायबर पोलीस ठाण्यात नागरिकाच्या फसवणूक प्रकरणी 5 जानेवारी 2024 रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदरील नागरिकाची रक्कम ज्या बँक खात्यात ऑनलाईन गेली होती ते बँक खाते सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे फ्रिज केले. सदरील रक्कम मध्यप्रदेशातील अशोकनगर येथे गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केली. अशोकनगर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची परवानगी घेत सायबर पोलिसांची पथक अशोकनगरमध्ये धडकले. त्या ठिकाणी त्यांनी 4 दिवस शोध मोहीम राबवत शिवेंद्र रघुवंशी या आरोपीस ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. त्याने इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर सर्वांना ताब्यात घेत स्थानिक न्यायालयात आरोपींना हजर करत ट्रॅझिट वॉरंटद्वारे बीड येथे आणण्यात आले.
हे साहित्य केले हस्तगत
आरोपींकडून विविध बँकांचे तब्बल 773 डेबिट कार्ड, विविध टेलिकॉम कंपनीचे 508 सिमकार्ड, विविध बँकांचे नवीन बँक खाते किट,1 स्वाईप मशीन, 5 मोबाईल, लॅपटॉप हे सर्व साहित्य सायबर पोलिसांनी हस्तगत केले.
Leave a comment