पावसाची पाठ तरीही पीकांची स्थिती समाधानकारक
कापूस, सोयाबीनसह तूर, मूग, उडीद उगवण ते वाढीच्या अवस्थेत
बीड । सुशील देशमुख
बीड जिल्ह्यात यंदा खरीपाच्या पेरण्या वेळेवर सुरु झाल्या. जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच मान्सूनचे आगमन झाले होते. पेरणीयोग्य पाऊस असल्याने शेतकर्यांनी वाफसा होताच कापूस लागवडीवर भर दिला तसेच सोयाबीन,तूर, मुग, उडीद, बाजरीची पेरणी केली. बुधवारअखेरपर्यंत जिल्ह्यात 89.60 टक्के म्हणजेच 7 लाख 4 हजार 66 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. महत्वाचे हे की, मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचा वेग मंदावला आहे. मात्र यापूर्वी झालेल्या पावसामुळे पीके तग धरुन आहेत. नुकताच कृषी विभागाने ‘हवामान व पिक परिस्थिती अहवाल’ सादर केला. त्यानुसार, खरीपातील सर्वच पीके उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून पिक परिस्थिती समाधानकारक आहे. सोयाबीनची पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या 1 लाख हेक्टरने वाढली आहे.News by Sushil Deshmukh
बीड जिल्ह्यात 3 जुलै अखेरपर्यंतच्या सरासरीच्या (140.8) च्या तुलनेत 209.7 मि.मी पाऊस झाला आहे. आजपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत 148.9 टक्के इतके पर्जन्यमान झालेले आहे. सर्वात कमी पाऊस वडवणी तालुक्यात 115.6 मि.मी. तर सर्वात जास्त पाऊस शिरूर तालुक्यात 184.5 मि.मी. झाला आहे. हवामान दमट व ढगाळ आहे. बीड जिल्ह्यात कापसाचे सरासरी क्षेत्र सर्वाधिक 3 लाख 55 हजार 494 हे आहे. यापैकी आजपर्यंत 2 लाख 53 हजार 975 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 71 टक्के आहे. तसेच सोयाबीनचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र 2 लाख 26 हजार 234 हेक्टर असून यापैकी आत्तापर्यंत 3 लाख 28 हजार 059 हे क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
ही पेरणी ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 145 टक्के आहे. बाजरीचे बीड जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र 69 हजार 485 हेक्टर आहे. आजपर्यंत 27 हजार 778 हे क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 40 टक्के आहे.तूरीचे सरासरी क्षेत्र 53 हजार 238 हेक्टर असून गुरुवारपर्यंत 42 हजार 912 हे क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 81 टक्के आहे. मुगाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र 21 हजार 876 हेक्टर आहे. यापैकी 9 हजार 321 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 43 टक्के आहे. याबरोबरच बीड जिल्ह्यात उडीदाचे सरासरी क्षेत्र 28 हजार 838 हेक्टर असून पैकी 35 हजार 529 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 123 टक्के आहे.
सर्व पिकांची स्थिती समाधानकारक
खरीप हंगामात 2024-25 मध्ये 3 जुलै अखेर एकूण 7 लाख 4 हजार 066 हे क्षेत्रावर पेरणी झालेली असून ती जिल्ह्याच्या सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या (7 लाख 85 हजार 786) तुलनेत 89.60 टक्के आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी ‘लोकप्रश्न’शी बोलताना दिली. सध्या जिल्ह्यात हवामान दमट व ढगाळ आहे. पावसाचे असमान वितरण असल्यामुळे तुरळक ठिकाणी पावसाची आवश्यकता आहे. मात्र असे असले तरी तूर्तास कोणत्याही पीकांवर रोग नसून सर्व पिके पिक उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून पिक परिस्थिती समाधानकारक आहे अशी माहिती त्यांनी लोकप्रश्नला दिली.
सोयाबीनची पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या 1 लाख हेक्टरने वाढली
कृषी विभागाच्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात सोयाबीनचे खरीपातील सर्वसाधारण क्षेत्र 2 लाख 26 हजार 234 हेक्टर इतके आहे. मात्र 3 जुलैअखेरच्या पेरणी अहवालात सोयाबीनची 3 लाख 28 हजार 59 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असल्याचे नमुद करण्यात आले आहे. ही पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तब्बल 1 लाख 1 हजार हेक्टर अधिक असून त्याचे प्रमाण तब्बल 145 टक्के इतके आहे. त्यामुळे कापसाच्या तुलनेत यंदा सोयाबीनचा पेरा प्रत्यक्षात इतका कसा वाढला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गतवर्षी कापसाला चांगला भाव न मिळाल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळल्याचे सांगितले जाते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------(News by Sushil Deshmukh)---------------------------------------------------------------------------------------------------------------------
Leave a comment