भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून सर्वेक्षण; जिल्ह्यात 126 विहिरींचे निरिक्षण
बीड । सुशील देशमुख
यंदा पावसाला वेळेवर सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनाही वेग आला आहे. मात्र गतवर्षीचा अत्यल्प पाऊस, कोरडे पडलेले प्रकल्प आणि सातत्याने होणारा भूगर्भातील पाण्याचा उपसा यामुळे भूजल पाणीपातळीत 0.8 मीटर इतकी घट झालेली आहे. यापूर्वी 1 मीटरची घट होती. बीड येथील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून सर्वेक्षण जिल्ह्यातील 126 विहिरींचे मे महिन्याच्या अखेरीस निरीक्षण केल्यानंतर त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य स्थितीच्या उपाययोजनांची व्यापक अंमलबजावणी आवश्यक आहे.
बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्या जिल्ह्यात 450 टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाळा वेळेवर सुरु झाला असला तरी जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यात विविध ठिकाणच्या अधिगृहित 126 विहिरींचे निरीक्षण मे महिन्यात करण्यात आले. यात आष्टी तालुक्यात सर्वाधिक 23 तर बीड तालुक्यात 18 विहिरी अधिगृहित आहेत. तसेच गेवराई 17, अंबाजोगाई 12, धारुर 4, केज 3, परळी 10, वडवणी 4, पाटोदा 9, शिरुरकासार 10 आणि माजलगाव तालुक्यात 16 विहिरीचा समावेश होता.तेथील भूजल पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या असता गत 5 वर्षांच्या तुलनेत बीड जिल्ह्याच्या भूजल पातळीत 0.8 मीटरने घट झाली आहे. गेल्यावेळी सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने आता मार्च 2024 अखेर पाणीपातळी घट होत चालली असून पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. अनेकदा पाणी साठा करुन ठेवल्यानंतरही नागरिक विद्युत पंपाव्दारे पाईप जोडून वाहने धुणे, घरासमोर रस्त्यावर बराचवेळ पाणी मारतात. मात्र यामुळे पाण्याची नासाडी होते. जूनमध्ये पावसाला सुरुवात होईपर्यंत नागरिकांनी पाण्याची शक्य तितकी बचत करणे अपेक्षित आहे.
भूजल सर्वेक्षणातून होतात उपाययोजना
-अधिगृहित केलेल्या विहीरीत जमिनीतील पाणीपातळी मोजून त्याचा अहवाल पुणे आयुक्तालयाबरोबरच जिल्हाधिकारी बीड यांना पाठवला जातो.भू वैज्ञानिक व तांत्रिक अधिकारी भूजल तपासणी करतात.टंचाईच्या उपाययोजना करण्यास सोपे जाते.पाच वर्षांपूर्वीची भूजल पाणी पातळी व नव्याने केलेल्या सर्वेक्षणाशी तुलना केली जाते.त्याआधारे भूूजल पातळीत किती मीटरने वाढ होत आहे की, घट हे स्पष्ट होते. संभाव्य पाणी टंचाईबाबत धोरण ठरवताना या तालुकानिहाय भुजलस्थितीचा आधार घेतला जातो अशी माहिती भूजल शास्त्रज्ञ रोहन पवार यांनी लोकप्रश्नशी बोलताना दिली.
Leave a comment