गेवराई तालुक्यात सर्वाधिक कापूस लागवड
बीड । सुशील देशमुख
यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने शेतकर्यांनी बी-बियाणे खरेदी करत खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात 12 जून अखेरपर्यंत 4.91 टक्के म्हणजे जवळपास 5 टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी ही माहिती दिली. वेळेवर आलेला पाऊस, आणि गतवर्षीच्या खरीपातील दुष्काळाची कसर भरुन काढण्याची शेतकर्यांना असलेली उत्कंठा यामुळे जिल्ह्यात 11 तालुक्यातील 38 हजार 596 हेक्टर क्षेत्रावर शेतकर्यांनी चाढ्यावर मुठ ठेवत पेरणी पुर्ण केली. महत्वाचे म्हणजे सोयाबीनचे भाव पडल्याने यंदा शेतकर्यांनी कापूस आणि तूरीवर भर दिला आहे.
बीड जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 7 लाख 85 हजार 786 इतके आहे. मागील बारा दिवसात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 112 मि.मी.पाऊस झाला आहे. वेळेवर मान्सून दाखल झाल्याने शेतकरी पेरणीसाठी आतूर झालेला आहे.कापसाचे सरासरी क्षेत्र 3 लाख 55 हजार 494 हेक्टर आहे. यापैकी 31 हजार 820 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 9 टक्के आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 2 लाख 26 हजार 234 हेक्टर आहे. यापैकी 5 हजार 440 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 2 टक्के आहे. बाजरीचे क्षेत्र 69 हजार 485 हेक्टर असुन 289 हे क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.तूरीचे 53 हजार 238 हेक्टर क्षेत्र आहे. पैकी 805 हेक्टरवर पेरणी झाली. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 2 टक्के आहे. मूगाचे सरासरी क्षेत्र 21 हजार 876 हे असून 180 हेक्टरवर पेरणी झाली आहे. उडीदाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र 28 हजार 838 हेक्टर असुन आजपर्यंत 61 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
दरम्यान अजूनही काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झालेला नाही, मात्र पेरणीसाठी शेत मशागतीची कामे पुर्ण करुन ठेवली गेली आहेत. बीड जिल्ह्यात आजपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत 219.3 टक्के इतके पर्जन्यमान झाले आहे. सर्वात कमी पाऊस (74.8 मि.मी.) वडवणी तालुक्यात तर सर्वात जास्त पाऊस (159.8 मि.मी.) गेवराई तालुक्यात झालेला आहे. सध्या हवामान ढगाळ कोरडे असले तरी बीडसह सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तूर्तास जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पाऊस झालेला आहे. कडा, दौलावडगाव, जातेगाव, धोंडराई, अंबाजोगाई, घाटनांदूर, धर्मापुरी व मोहखेड या आठ महसुल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. बीड जिल्ह्यात 12 जूनअखेर एकूण 38 हजार 596 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून ती जिल्ह्याच्या सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या (7,85,786) तुलनेत 4.91 टक्के आहे.
शेणखत, सेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढवा
शेतकर्यांनी नॅनो खताचा जास्तीत जास्त वापर करावा बीड जिल्हयाची खरीप हंगामाची खताची गरज 180000 मे टन असून आज अखेर 151664 मे टन खते बाजारात उपलब्ध झाले आहे. यामध्ये युरिया 38795 मे. टन शिल्लक आहे. रासायनिक खताचा साठा कोणत्या दुकानात किती आहे, याची माहिती तालुकानिहाय विक्रेतेनिहाय कृषक पवर दररोज उपलब्ध करुन दिली जात आहे. शेतकरी बाधवांनी कृषक अॅपवरच्या माहितीचा वापर करुन खते खरेदी करावीत. विशिष्ट ग्रेडच्या खताचा आग्रह धरु नये, शेणखत, सेंद्रिय व जैविक खतांचा वापर केल्यास पिकांना दिलेली रायायनिक खते लवकर उपलब्ध होतात, त्यामुळे अशा प्रकारच्या खतांचा वापर वाढवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करा
विविध कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. विविध पिकांमध्ये बियाणे आणि जमिनीच्या माध्यमातून कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये बीजप्रक्रियेचा देखील समावेश होतो. त्यासाठी पेरणीपूर्वी शिफारशीनुसार प्रत्येक पिकाच्या बियाणास बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. बीजप्रक्रियेचे महत्त्व बियाण्याची उगवण क्षमता वाढते, रोपांची सतेज व जोमदार वाढ होते.रासायनिक खतांची 20 ते 25 टक्के बचत होते.जमिनीतून व बियाण्यांद्वारे पसरणार्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.पीक उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ मिळते.
Leave a comment