बीड । वार्ताहर

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता केव्हाही लागू शकते. महायुती आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. सन 2004 ते 2024 या वीस वर्षांच्या कालावधीचा आढावा घेतला तर जिल्ह्यात या काळात लोकसभेच्या चार पंचवार्षिक व एकदा पोटनिवडणूक झाली. चार पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकदाच यश मिळाले आहे. एकंदरच मागील 20 वर्षातील जिल्हयातील ही राजकीय स्थिती लक्षात घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला जनतेने नाकारलेले दिसते. 4 पंचवार्षिकमध्ये केवळ 1 वेळेसच राष्ट्रवादीला बीड लोकसभेत विजय मिळवता आलेला आहे. बीड लोकसभा भाजपचा गड राहिलेला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासह त्यांच्या इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी बीड लोकसभेत चमत्कार घडवणार का? की येथील जनता पुन्हा भाजपासोबत जाणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा कायम आहे. आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेले आरक्षण मान्य नाही. ते सध्या विविध ठिकाणी दौरा करत आहेत. दुसरीकडे मराठा समाज बांधवांनीही गावागावातून 1 उमेदवार लोकसभा निवडणूकीसाठी उभा करण्याचा आणि कोणत्याही राजकीय व्यासपीठावर जायचे नाही असा निर्धार केलेला आहे. या स्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
भाजपसाठी यंदा जमेची बाजू म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष व एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्यासोबत असल्याने महायुती भक्कम दिसते. मात्र शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग बीड जिल्ह्यात आहे. एक काळ असा की, जिल्ह्यातील सहाही विधानसभा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले होते. तर नंतर सर्व उमेदवार भाजपा महायुतीचे निवडून आले होते. आता शिवेसना (उध्दव ठाकरे) आणि काँग्रेसच्या सहकार्याने शरद पवार हे बीड जिल्ह्यात निर्णायक भूमिका घेवू शकतात असा विश्वास त्यांच्या पक्षातील नेते व्यक्त करतात. असे असले तरी यापूर्वीच्या लोकसभा निवडणूकींचा आढावा घेतला तर जयसिंगराव गायकवाड पाटील हे 2004 ते 2009 पर्यंत बीडचे खासदार राहिले, त्यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार प्रकार सोळंके यांचा पराभव केला होता. महत्वाचे म्हणजे या लोकसभेपूर्वी जयसिंगराव गायकवाड अगोदर भाजपाकडून 1998-99 व 1999 ते 2004 या दोन निवडणूकीत भाजपकडून विजयाचा गुलाल अंगावर घेत खासदार झाले होते, त्यामुळे त्यांनी 2004 ला पक्ष बदलल्यानंतरही जनतेने स्वीकारले होते. मात्र 2009 नंतर बीड लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील जनतेने भाजप युतीवर भरभरुन प्रेम केल्याचे दिसते. दिवगंत लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे सलग दोन वेळेस (2009 व 2014) बीड लोकसभेतून भरघोस मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करुन विजयी झाले. 2014 मध्ये नंतर देशात मोदी लाट होती. त्यावेळी गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे केंद्रीय ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी दिली गेली, मात्र नंतर त्यांचे काही दिवसातच अपघाती निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत त्यांची कन्या डॉ.प्रितम मुंडे यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसह इतर पक्षांनी आपला उमेदवार दिला नव्हता; पण काँग्रेसकडून माजी मंत्री अशोक पाटील निवडणूकीला सामोरे गेले, मात्र डॉ.प्रितम मुंडे यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. या पोटनिवडणूकीनंतर 2019 मध्ये खा.प्रितम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत झाली; मात्र या निवडणूकीतही जिल्ह्यातील जनतेने प्रितम मुंडे यांनाच विक्रमी मतांनी निवडून दिले. आता मात्र भाजपाने प्रितम मुंडे ऐवजी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी प्रचाराचे दोन टप्पेही पुर्ण केले आहेत.


बजरंग सोनवणे पाच वर्षानंतरच चमकले!

बीडचे नेते राजकीय भूमिका बदलतात हा इतिहास आहे. कारण लोकसभा निवडणूकीत ज्यांनी भाजप नेते दिवगंत गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली ते माजी मंत्री सुरेश धस आणि रमेश आडसकर नंतर भाजपात आले. तर जयसिंगराव गायकवाड पाटील हे राष्ट्रवादीकडून खासदार होण्यापूर्वी दोन टर्म भाजपकडूनच निवडून आले होते हे विशेष. आताही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे बजरंग सोनवणे महिनाभरापुर्वी महायुतीमध्ये होते. गतवेळी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर ते पुन्हा या निवडणूकीतच चमकले.गत पाच वर्षात कधी बांधावरही गेले नाहीत आणि कधी विकासाच्या मुद्यावर आंदोलनही केले नाही. केवळ जिल्हा परिषद अन् आपण एवढा सिमीत कारभार त्यांनी केला. त्यामुळे आता लोकसभेत त्यांना मतदार कसे स्विकारणार? याकडेही जिल्ह्याचे लक्ष आहे.


जयदत्त क्षीरसागरांनी 2004 मध्ये घडवला होता चमत्कार

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. आज जी राजकीय परिस्थिी आहे तीच स्थिती 2004 मध्ये होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयसिंगराव गायकवाड उमेदवार होते. त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये जयदत्त क्षीरसागर, सय्यद सलीम आणि बदामराव पंडीत हे तिघेच सक्रीय होते. बाकी सर्व नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले होते.त्यावेळी मुंडे यांनी प्रकाश सोळंकेेंना भाजपची उमेदवारी दिली होती. जयसिंगराव गायकवाड हे निवडून येतील असे त्यावेळी कोणालाही वाटले नव्हते. मात्र ओबीसींची मोट बांधत जयदत्त क्षीरसागरांनी ओबीसी आणि मराठा असा सोशल इंजिनियरिंगचा प्रयोग करत जयसिंगराव गायकवाड यांना निवडून आणले होते. आज परिस्थिती तशी नाही. बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी असली तरी राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी जिल्ह्यात स्ट्राँग आहे. पाठोपाठ भाजपही पॉवरफुल आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी या निवडणूकीत अद्यापही कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही; मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपातील मोठ्या नेत्यांशी त्यांचे असलेले मैत्रीपुर्ण संबंध पाहता ते ऐनवेळी आपले राजकीय वजन पंकजाताई मुंडे यांच्या पारड्यात टाकू शकतात. त्यामुळे 2004 चा चमत्कार यावेळी घडण्याची शक्यता सुतराम शक्यता नाही.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.