डॉ.ज्योती मेटे यांचे बीडमध्ये विरोधकांना आव्हान

जनतेशी संवाद साधून राजकीय भूमिका स्पष्ट करणार

 

बीड । वार्ताहर

निष्ठा, प्रेम, सर्मपण काय असतं हे शिवसंग्रामकडून सर्वांनी शिकावे. सेनापती नसताना सुध्दा त्यांचे सैन्य अविरत चालते आहे. हे शिवसंग्रामचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. मी बीडमध्ये आज कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारी घेवून आले नाही, पण तुम्ही सर्वांनी ज्या उत्साहाने माझे स्वागत केले, ते पाहून मला पुन्हा-पुन्हा वाटतेय की, ‘हे शिवधनुष्य मला पेलावे लागणार आहे. बीड जिल्ह्यातील सर्व जनतेशी चर्चा करुन तसेच पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन मी राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे विचलित होवू नका, एकदा निर्णय घेतल्यानंतर तिथून मी माघार घेणार नाही. शेंडी तुटो अथवा पारंबी तुटो...अशा शब्दात शिवसंग्रामच्या नेत्या डॉ.ज्योतीताई मेटे यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.लोकसभेसाठी मी उमेदवार असावी असे जर बीडच्या जनतेला वाटत असेल तर अर्धी लढाई मी आत्ताच जिंकली आहे. तसेच  मला जर एका वाक्यात विचारले की, ‘तू कोण आहेस, तर मी सांगेन, अंगा-खांद्यावर ओरखडे बाळगणारी मी जखमी वाघीण आहे, नका नाद करु तिचा’ असा इशाराही त्यांनी राजकीय विरोधकांना लगावला.

 

 

मविआकडून बीड लोकसभेसाठीच्या इच्छुकात आघाडीवर नाव असलेल्या शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या डॉ.ज्योती विनायक मेटे यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांना गुरुवारी बीडमधून उमेदवारी जाहीर केली. दरम्यान शुक्रवारी (दि.5) सायंकाळी डॉ.ज्योती मेटे समर्थकांसह शेकडो वाहनांचा ताफा घेवून गेवराईमार्गे बीडमध्ये दाखल झाल्या. यावेळी शिवसंग्राम भवनमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी माझ्या बंधूप्रमाणे माझ्या पाठीशी राहिलेले आहेत. तुम्ही मला जपलं म्हणून मी तुम्हाला जपलं असे आपले समीकरण सांगायचे असेल तर मी आज नि:संकोचपणे सांगू शकते की, साहेबांपेक्षा जास्त कंकणभर जपण्याचा प्रयत्न मी माझ्या शिवंसग्रामच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केला आहे. त्यात मला किती यश आले हे मी सांगू शकत नाही परंतु आज ज्या ताकदीने तुम्ही माझ्या पाठीशी उभा आहात. मला पुढे चालण्यासाठी प्रवृत्त करत आहात, तेव्हा मी स्वत:ची पाठ थोपटून घेते. गेल्या दीड वर्षात एवढे आघात पचवले आहेत की, मला जर एका वाक्यात विचारले की, ‘तू कोण आहेस, तर मी सांगेन, अंगा-खांद्यावर ओरखडे बाळगणारी मी जखमी वाघीण आहे, नका नाद करु तिचा’ असेही ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले.

 

दिवगंत मेटे साहेबांचे लाडक स्वप्न होतं शिवसंग्राम आणि ते इथून पुढेही जपण्याचा प्रयत्न होत राहिल. दूर-दूरपर्यंत आपल्या कोणाच्याही मनात ही लोकसभा निवडणूक लढवायचे कुठेही नियोजनात नव्हते.पण तरीही बीड लोकसभेसाठी मी उमेदवार असावी असे जर बीडच्या जनतेला वाटत असेल तर अर्धी लढाई मी आत्ताच जिंकली आहे असे सांगत ज्योती मेटे म्हणाल्या, आता निर्णय जो व्हायचा तो होईल पण कुठल्याही राजकीय पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी सर्वसामान्य विस्थापित जनतेतून माझं नाव पुढे आले. हे नाव का पुढे आलं असावं याचा मी माझ्या परीने धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. मेटे साहेब हे स्वत: एक विस्थापित आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विस्थापितांचा चेहरा म्हणून काम करणारी व्यक्ती होते. समाजासाठी अहोरात्र उपलब्ध असणारी, लढणारी आणि आयुष्याचा शेवटचा श्वासही शेवटचा समाजासाठीच घेणारी व्यक्ती होते. त्यामुळे तोच विस्थापितांचा चेहरा सामान्यांना माझ्यात दिसला असावा, पण तुमच्या सर्वांच्या दुर्दम्य आत्मविश्वासाची तुलनाच होवूच शकत नाही. मागील काही दिवसांत माझ्याबाबतीत उमेदवारीसंदर्भात जी चर्चा झाली, ती म्हणजे आपली असलेली कमकुवत आर्थिक बाजू आहे. मेटे साहेबांनी धन नाही पण जन खूप कमावले. त्यामुळेच आज एक-एक मावळ्यात शंभर मावळ्याची ताकद आहे असे त्या म्हणाल्या.

 

प्रचंड शक्ती प्रदर्शन करत डॉ.ज्योती मेटे बीडमध्ये दाखल

 

शुक्रवारी (दि.5) सायंकाळी डॉ.ज्योती मेटे समर्थकांसह शेकडो वाहनांचा ताफा घेवून गेवराईमार्गे बीडमध्ये दाखल झाल्या. बीडमध्ये येण्यापूर्वी गेवराईत मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगेंसमवेत त्यांनी आयोजित इफ्तार पार्टीत उपस्थिती दर्शवली. यावेळी शिवसंग्रामचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंतर त्यांनी बीडमध्ये दाखल होत दिवंगत विनायकराव मेटे यांच्या स्मृतीस्थळी जावून अभिवादन करत पुढे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन त्या शिवसंग्राम भवनमध्ये पोहचल्या.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.