भाजपचे हिंदुत्व दंगली घडवणारे;कितीही कपटनितीने राजकारण
केले तरी विजय उध्दव ठाकरेंचाच होणार-सुषमा अंधारे
बीड । वार्ताहर
कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 36 सभा घेतल्या, 27 रोड शो केले मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्रातील 40 आमदार त्यांच्या सोबत गेले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरले मात्र मिंदे गटाच्या 40 आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावून निवडून येऊन दाखवावे तसे झाले तर मी राजकारण सोडेन असे थेट आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खा.संजय राऊत यांनी शनिवारी बीडमध्ये भाजप-शिंदे सरकारला दिले. तर महागाई, बेरोजगारीकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे यासाठी भाजप सरकार हिंदुत्वाचा मुद्दा समोर करुन दोन धर्मात तेढ निर्माण करत आहे. भाजपाचे हिंदुत्व हे दंगली घडवणारे आहे. मात्र केंद्रातील अन् राज्यातील भाजप सरकारने कितीही कपटनितीने राजकारण केले तरी निवडणूकीच्या कुरुक्षेत्रावर विजय हा फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच होईल असा विश्वास ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
बीड येथे शनिवार दि.20 मे रोजी शहरातील पारस नगरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप जाहीर सभेने झाला. यावेळी खा.राऊत व सुषमा अंधारे यांनी जोरदार भाषणाने सभा गाजवली. यावेळी खा. संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे, जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री बदामराव पंडित,जिल्हाप्रमुख अनिल जगताप, राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण, विभागीय सचिव अशोक पटवर्धन, संपदा गडकरी , विलास महाराज शिंदे,गणेश वरेकर, बाळासाहेब अंबुरे, परमेश्वर सातपुते, युद्धाजित पंडित,बाप्पासाहेब घुगे, शेख निजाम , पंकज कुटे, नितीन धांडे, राजू वैद्य,हनुमान जगताप, सुनील अनभुले, सुदर्शन धांडे, सागर बहिर, गोरक्ष सिंगण, किशोर जगताप, सुशील पिंगळे, रतन गुजर, हाफिज अश्फाक यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, संघटक, पदाधिकारी उपस्थित होते.सभेपूर्वी खा. संजय राऊत ,उपनेत्या सुषमा अंधारे यांचा भव्य मोटारसायकल रॅलीने स्वागत करण्यात आले. या रॅली दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे जेसीबीने हार घालून त्यांचे सत्कार करण्यात आले. सभेचे प्रस्ताविक माजी आ.सुनील धांडे यांनी केले. कृषी बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
खा.संजय राऊत म्हणाले, मिंधे सरकारने राज्यातील जनतेला शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला, त्यांना लाजा वाटल्या पहिजेत, शिधा काय वाटता असा प्रश्न उपस्थित करत 40 आमदारांना 50-50 कोटीचा आनंदाचा शिधा देता तेही फक्त शिवसेना फोडण्यासाठी आणि दिल्लीच्या पायाशी महाराष्ट्र गहाण ठेवण्यासाठी. गरिब लोकांची थट्टा करताना काहीतरी लाज वाटली पाहिजे, याद राखा हीच गोरगरीब जनता तुम्हाला आणि त्या 40 चोरांना जनताच जमिनीवर लोळवेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. खा संजय राऊत म्हणाले, महाप्रबोधन यात्रा आज मी प्रत्यक्ष पाहिली. जेव्हा सुषमाताईंनी ही यात्रा सुरू केली तेव्हा मी तुरुंगात होतो आणि मी तुरुंगातून यात्रा पाहिली की शिवसेनेची ही वाघीण एका संकटाला भेदून एक यात्रा यशस्वी करते आहे.
2022 सालचे अतिवृष्टीचे अनुदान शेतकर्यांना अजून पर्यंत मिळालेला नाही. सरकार कुठे आहे.या राज्याची परिस्थिती विदारक आहे.
दोन हजार नोटांची बंडल त्यांच्या आमदारांकडे असतील. भाजपच्या शेठजीकडे आणि अडाणीकडे असतील, कष्टकरी ऊसतोड कामगार मजूर यांच्याकडे ते नसतात असे सांगत राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने या या मिध्याचे सरकार डिसमिस केले आहे. मिंधे सरकारला लाज असती तर यांनी राजीनामा दिला असता. मोदी सरकार फेकु आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे सरकार या फेकु मंडळींनी आणले आहे. मात्र या फेकू सरकारचा कर्नाटकमध्ये पराभव झाला तो सर्व देशाने पाहिला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळ प्रचारासाठी फिरले. कनार्टकात 36 सभा, 27 रोड शो केले तरीही त्या प्रत्येक मतदार संघात भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावतो तुम्ही मोदींच्या फोटा लावा आणि मग कळेल महाराष्ट्र कोणाचा आहे. लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे, चिड आहे, ते निवडणूका कधी येतात याची वाट पाहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशीची गद्दारी या चाळीस बेइमानांनी केलेली आहे असे सांगत राऊत म्हणाले, मिधे आमदारांनी मोदींचा फोटा लावून पुन्हा निवडून येवून दाखवावे मी राजकारण सोडून देईल असे आव्हानच त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिले.
याप्रसंगी सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपचे हिंदुत्व हे हिंदू - मुस्लिम समाजात दंगली करून लोकांची घर पेटवणारेआहे.मात्र हे हिंदुत्व महाराष्ट्राला नको आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात गोरगरिबांच्या चुली पेटवणारे, अडला नडलेल्यांच्या दुःखी त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारे हिंदुत्व अपेक्षित आहे, अरे काय हिंदुत्व तुम्हाला कळतं का असा सवाल अंधारे यांनी भाजपला विचारला. शेगाव,अकोल्यातील दंगली भाजपला हव्या आहेत असा आरोप त्यांनी केला.केंद्रात मोदी फेकतात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस खोटे बोलतात असे म्हणून अंधारे यांनी दोघांवर चौफेर टीका केली.
त्या म्हणाल्या, स्व.गोपीनाथ मुंडेंची आजही आम्हाला आठवण येते, मात्र तसा भाजप आता राहिला नाही. भाजप आता कळसुत्री बाहुल्या खेळवत आहे. आमचे 40 भावांना भाजप सध्या खेळवत आहे. भाजपाची अशीच वापर करायची निती आहे. रासपच्या महादेव जाणकरांना, सदाभाऊ खोत यांना भाजपाने दूर केले. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. महाप्रबोधन यात्रा कशासाठी असा प्रश्न काहीजणांना पडतो, पण ही यात्रा सरकारला प्रश्न विचारण्यासाठी आहे. भाजप लोकांना जाती-धर्म अन् हिंदुत्वाच्या फ्रेममध्ये अडकवते. मोदींच्या काळात महागाई प्रचंड वाढली हे सांगताना त्यांनी काही व्हिडीओही दाखवले. आम्ही प्रश्न विचारतो, पण पण पुरावाही दाखवतो. आता सिलेंडर, डिझेल,पेट्रोलच्या किमती प्रचंड वाढल्या, पण हे सरकार त्यावर काही बोलत नाही. उपाययोजना शून्य पण जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधते. भाजपाने हिंदुत्व त्यांनाच कळते ही नौटंकी बंद करावी. लोकांचे घर पेटवणारे हिंदुत्व महाराष्ट्राला नको आहे. लोकांच्या डोळ्यातील पाणी पुसणारे हिंदुत्व आम्हाला हवे आहे.मोदीजी लोकांना वेड्यात काढतात. हे सांगताना सुषमा अंधारे यांनी किती जणांना रोजगार मिळाला, किती जणांच्या खात्यात पंधरा लाख आले? असे सवाल करत भाजप आणि त्यांच्या धोरणावर सडकून टिका केली. मोेफत एसटी प्रवास नको तर महिलांसाठी सिलेंडर साडेतीनशे रुपयांना द्या, गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या. हे काम केंद्र अन् राज्य सरकारने करावे. पण सरकार याकडे दुर्लक्ष करत हिंदु-मुस्लिम वाद लावण्याचे काम करत आहे. भाजपला कोणी प्रश्न विचारु नयेत म्हणून ते धार्मिक दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करते असा गंभीर आरोपही सुषमा अंधारेंनी केला. कपटनितीने राज्य बळकावणारे देवेंद्र फडणवीस त्यांचा खेळ उघडा पडू नये म्हणून लोकांचे लक्ष विचलित करत आहेत, राष्ट्रवादीसोबत जाणार नाही असे जाहीर सांगणारे फडणवीस नंतर राष्ट्रवादीच्याच अजितदादांसोबत शपथ घेतात. राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करताना भाजपाचे हिंदुत्व धोक्यात येत नाही मग आम्ही शिवसेनेने दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्यासच हिंदुत्व धोक्यात कसे येते, असा सवालही सुषमा अंधारेंनी केला. सभेला जिल्हाभरातून आलेले शिवसैनिक,नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात शिवसेनेला तीन जागा द्या-अनिल जगताप
याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले बीड जिल्हा हा सुरुवातीपासूनच ठाकरेंना मानणारा आहे. आता तर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत चाललेली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना बीड, केज व गेवराईची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी त्यांनी खा.संजय राऊत यांच्याकडे केली. बीड मार्केट कमिटीत आपली सत्ता आली. आगामी काळात नगराध्यक्ष-जि.प.अध्यक्षही आघाडीचाच असेल असा विश्वासही अनिल जगताप यांनी व्यक्त केला.
नयना सिरसट यांचा शिवसेनेत प्रवेश
याप्रसंगी केज विधानसभा मतदार संघातील नयना सिरसाट यांना शिवसेना ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला. त्यांचा खा.संजय राऊत, सुषमा अंधारे, चंद्रकात खैरे व मान्यवरांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला.
Leave a comment