बीड विभागात आठ आगारातून 6 लाख 32 हजार जेष्ठांचा मोफत प्रवास
बीड । वार्ताहर
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या योजनेतंर्गत 26 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्ह्यातील 6 लाख 32 हजार 681 जेष्ठ नागरिकांनी विनामूल्य प्रवास केला. राज्य शासनाच्या या योजनेतून एसटी महामंडळाच्या बीड विभागाला या कालावधीत 3 कोटी 60 लाख 29 हजार 755 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बीड विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी ‘लोकप्रश्न’शी बोलताना ही माहिती दिली.
‘अमृत जेष्ठ नागरिक’ योजनेला बीड जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रवाशी तिकिट परतावा शासनाकडून एसटी महामंडळाला मिळणार असल्याने एसटीचे उत्पन्नही यामुळे वाढणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ‘अमृत जेष्ठ नागरिक’ असे या योजनेला संबोधले जाते. राज्यातील 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेचा शुभारंभ होवून आता तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. या सेवेचा लाभ महाराष्ट राज्याच्या हद्दीतील प्रवासासाठी असणार आहे.
75 वर्षांवरील जेष्ठ नागरिक या योजनेला प्रतिसाद देताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यात एसटीचे बीड,धारुर, माजलगाव,परळी,गेवराई, पाटोदा, आष्टी आणि अंबाजोगाई असे 8 आगार आहेत. या सर्व आगारात 26 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्ह्यातील 6 लाख 32 हजार 681 इतक्या (75 वर्ष वयापुढील) जेष्ठ नागरिकांनी विनामूल्य प्रवास केला आहे. या प्रवासाची तिकिट रक्कम 3 कोटी 60 लाख 29 हजार 755 रुपये इतकी आहे. दरम्यान या प्रवासाचा तिकिट परतावा राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मिळणार असल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीस भर पडणार आहे.
Leave a comment