जिल्ह्यात शिक्षकांची काय अवस्था? जि.प.शाळांची झाली दुरावस्था
बीड । वार्ताहर
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गंगापूर - खुल्ताबाद मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांनी बुधवारी 23 ऑगस्ट रोजी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सर्व शिक्षक तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयीच वास्तव्यास असणे आवश्यक आहे. याबाबत विधानसभेत मुद्दा उपस्थित केला व अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी व शिक्षक मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक करतात असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून अनेक शिक्षकांनी आमदार बंब यांना फोन करून याविषयी जाब विचारला होता. खरेतर मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एकंदरीत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची काय अवस्था आहे? ते मुख्यालयी राहतात का? त्यामुळे जि.प.शाळांची आणि शाळेतील विद्यार्थ्यांची किती दुरावस्था झाली आहे? बीड जिल्ह्यामध्ये तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थीच राहिले नाहीत.
बीड शहरातील काही शाळांची अवस्था अशी आहे की तिथे विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी परिस्थिती आहे. मग आ.प्रशांत बंब काय चुकीचे बोलले? खरे तर आज शिक्षक दिन आहे. शिक्षकांनी निदान शिक्षणाविषयी आवड असणार्या शिक्षकांनीतरी याबद्दल आत्मपरिक्षण करायला हवे. सर्वच शिक्षक यामध्ये दोषी आहेत असेही नाही. काहीजण जरेवाडीची शाळा घडवणारे शिक्षकही आहेत. तर काही शाळांमधून संगणकाचे ज्ञान देणारे, पर्यावरणविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणारे, पिंपळादेवी सारख्या गावातील शाळेमधील शिक्षकही आहेत. खरेतर त्यांचा आदर्श इतर शिक्षकांनी घ्यायला हवा. संघटनेचे पदाधिकारी तर वर्षानूवर्षे शाळेत जात नाहीत. अनेक शिक्षकांचे काय धंदे आहेत हे सांगायला नको. मध्यंतरी तुकाराम गुरूजी सेवाभावी संस्थेच्या करमणूक केंद्रावर पत्ते खेळताना शिक्षकच पकडले गेले होते. मग प्रशांत बंब काय चुकीचे बोलले? फक्त एवढेच की ते खरे बोलले. खरे बोलले तर जन्मदात्या आईलाही राग येतो असे म्हणतात. परंतू समाजाचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, गुरूवर्य म्हणून ज्यांना उपाधी लावली जाते अशा शिक्षकांनी आत्मपरिक्षण करण्याची खरच वेळ आली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची अवस्था अत्यंत दयनिय आहे. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी जर मनावर घेवून ठरवले तर 40 टक्यापेक्षा जास्त शिक्षक घरी जातील. परंतू सर्वकाही ‘जावू द्या, आपल्याला काय करायचे’ या नावाखाली अलबेल चालू आहे.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी निमित्त शिक्षकदिन साजरा केला जातो. अब्राहम लिंकन यांनी देखील विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांना पत्र लिहिले आहे. शिक्षक समाजामध्ये एका आदरस्थानावर आहे. मात्र आजचे आणि त्यातही जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागातील शिक्षकांनीच हा आपल्यातील आदरभाव गमावला असल्याचे परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शाळेत विद्यार्थी येतील की नाही? अशी परिस्थिती आहे. मग त्या परिस्थितीमध्ये शिक्षकांना सामाजिक किंमत किती राहणार आहे? याचे भान शिक्षकांच्या या पिढीला ठेवावे लागणार आहे. परंतू ते कोण ठेवणार? हा खरा प्रश्न आहे.
संघटनेचे पदाधिकारी तर वर्षानुवर्षे तालुकास्तरावरच
शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी अनेक संघटना आहेत. काही संघटना राजकीय पक्षाशी संबंधीत आहेत. जुन्या संघटना केवळ शिक्षकांच्याच होत्या. या संघटनांचे राजकारण कुठल्या पातळीपर्यंत जावू शकते हे देखील अनेकवेळा समाजाने अनुभवले आहे. संघटनेचे पदाधिकारी शाळेवर कधी जातात? त्यांनी खरच शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत का? विद्यार्थ्यांच्या समस्याविषयी शिक्षक संघटनांनी कधी आवाज उठवला का? त्यातून काय साध्य झाले? याचा विचार सर्वच शिक्षक संघटनाच्या पदाधिकार्यांनी करायला हवा. खरेतर शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येक विभागातून दोन आमदार विधीमंडळात जातात. तरीही शिक्षकांचे प्रश्न कायम आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण नसायला हवे. परंतू संघटनेचे पदाधिकारी याशिवाय करतात तरी काय?
टिईटि घोटाळ्यामुळे सार्वत्रिक बदनामी
शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टिईटीमध्ये सात उमेदवार शासनाने अपात्र केले आहेत. त्यांना नौकरीतून बडतर्फ केले आहे. आता ऑगस्ट महिन्यापासून शिक्षकांचा पगारही बंद झाला आहे. हे शिक्षक न्यायालयात गेले आहेत मात्र ज्या पुणे क्राईम ब्रँचने या टिईटी घोटाळ्याची चौकशी केली त्यांनी सर्व बाबींचा विचार करूनच कारवाई केली आहे. टिईटी घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्राची सार्वत्रिक बदनामी झाली आहे. यामध्ये कुठल्याही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी अद्याप काहीही बोलले नाही. ना त्यांनी चौकशीचे समर्थन केले किंवा ना शिक्षकांच्या बाजुने बोलले. मग संघटना कशासाठी? असा सवालही होत आहे.
पत्नीच्या नावावर गोदावरी मल्टीस्टेटच्या माध्यमातून शिक्षकाची सावकारी
बीड असेल, गेवराई असेल किंवा इतर काही शहरामध्ये अलीकडे मल्टीस्टेटचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. बीडमध्ये शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी एकत्र येवून अनेक मल्टीस्टेट काढल्या आहेत. गेवराईतही उदाहरण द्यायचे झाले तर गोदावरी मल्टीस्टेटच्या माध्यमातून अधिकृत सावकारीच चालते. पत्नीच्या नावावर मल्टीस्टेट किंवा बँका काढायच्या आणि स्वत:चे प्रस्थ निर्माण करायचे. गोदावरी मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा प्रभाकर पराड यांनी तर गोदावरी मल्टीस्टेटचा कारभार जिल्ह्याच्या बाहेर नेला आहे. शाळेमध्ये कधी जातात, ज्ञानार्जनाचे काम कधी करतात? व्यस्त कार्यबाहुल्यातून त्यांना वेळ कधी मिळतो? हा खरा प्रश्न आहे. अर्थात केवळ प्रभाकर पराडच याला दोषी आहेत असेही नाही. त्यांनी गोदावरी मल्टीस्टेटसाठी जेवढे परिश्रम घेतले तेवढे त्यांच्या शाळेसाठी घेतले असते, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेतले असते तर समाजामध्ये आदर्श शिक्षक म्हणून त्यांची गणना झाली असती. परंतू एक बँकर म्हणून आता त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सोशल मिडीयावर त्यांच्या मल्टीस्टेटची जेवढी मार्केटिंग अथवा पोस्ट केल्या जातात तेवढा वेळ त्यांनी कधी शाळेत दिला का? याचाही विचार शिक्षकांनी करायला हवा. गेवराईमध्ये तर मल्टीस्टेटचे पेव फुटले आहे. तीच परिस्थिती बीडमध्ये आहे. माजलगाव, परळी, अंबाजोगाई या शहरातही अनेक मल्टीस्टेटमध्ये शिक्षक आणि त्यांचे परिवारातील सदस्य हेच संचालक आहेत. माजलगावमधील काही मल्टीस्टेटचे काय झाले? याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. मुळातच कोणी काय व्यवसाय करावा? याला बंधन नाही. परंतू समाजाचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्यांनीतरी यासंदर्भात विचार करणे गरजेचे आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधुन या भावना समाजमनातून व्यक्त होत आहेत.
Leave a comment