पंचनामे न करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करणार
बीड । सुशील देशमुख
जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेबर या कालावधीतील अवघ्या तीस दिवसात 11 वेळेस अतिवृष्टी झाली. 63 पैकी 61 महसुल मंडळात सातत्याने 100 मि.मि.पेक्षा अधिक पाऊस पडला. यात खरीपाची सारीच पिके जमीनदोस्त झाली. शेतात साचलेल्या पाण्याचा आठ दिवसानंतरही निचरा झाला नाही. या सार्या परिस्थितीत शेतकरी हतबल झाला असून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज गुरुवारी (दि..7) बीड तालुक्यातील नुकसान पाहणी केली. या दौर्यात त्यांनी ट्रॅक्टर अथवा बैलगाडीचा आधार न घेता शेतातील चिखल तुडवत शेतकर्यांचे दु:ख जाणून घेतले. त्यांचे नुकसान पाहिले. तालुक्यातील किन्हीपाई येथे पाहणीदरम्यान नुकसानीचे अद्याप पंचनामे झाले नसल्याचे ग्रामस्थांनी आयुक्तांजवळ बोलून दाखवले. तेव्हा अशा बेफिकिर कर्मचार्यांना निलंबित केले जाईल, तशा सूचनाही देवू असे सांगत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगीतले.
बीड जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाला प्रचंड मोठा फटका बसला आहे. या सार्या नुकसानीच्या पाहणीसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर गुरुवारी बीड जिल्हा दौर्यावर आले. सकाळी आगमन झाल्यानंतर त्यांनी बीड तालुक्यातील माळापुरी, नांदुर हवेली, कुर्ला, किन्हीपाई ,भाटसांगवी, औरंगपूर या ठिकाणी शेतात जावून शेत पिकांची पाहणी केली. शेतकर्यांशी संवाद साधला. त्यांचे दु:ख जाणून घेत शासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह कृषी व महसुल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कुर्ला ते औरंगपूर हा दीड किलोमीटर अंतराचा रस्ता चिखल तुडवत जावून शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. विशेष म्हणजे यावेळी गावकर्यांनी ट्रॅक्टर आणले पण त्यातून जाण्यास नकार देत आयुक्त केंद्रेकरांनी पायी चालणे पसंत केले.
शेतकर्यांचे दु:ख जाणलं आता तातडीने मदतीचही बघा
सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजुर, वंचित, उपेक्षितांच्या न्यायासाठी काम करणारा अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्याकडे पाहिले जाते. अत्यंत शिस्तप्रिय आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आपल्या कार्यकुशल नेतृत्वातून प्रशासनाचा कारभार लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने काम करणारे अधिकारी अशी सुनील केंद्रेकरांची यांची ओळख. बीडचे जिल्हाधिकारी ही त्यांची कारकिर्द म्हणूनच आजही जिल्हावासीयांच्या स्मरणार्थ आहे. केंद्रेकरांसमोर गेलेले जनतेचे काम पुर्ण होतेच हा त्यांनी आपल्या कामातून निर्माण केलेला विश्वास सर्वत्र अनुभूती देतो. यंदाचा खरीप हंगाम शेतकर्यांसाठी दु:खाचा डोंगर ठरला. जितकं पेरलं तितकं अतिवृष्टीने मातीमोल केलं. हाती काहीच उरलं नाही. दरम्यान केंद्रेकरांनी पाहणी केल्याने आता शेतकर्यांयाही आशा पल्लवीत झाल्या असून ‘केंद्रेकर साहेब शेतकर्यांचं दु:ख तुम्ही जाणलं आता तातडीने मदतीचही बघा’ अशा भावना आज शेतकर्यांनी व्यक्त केल्या.
अतिवृष्टीने जिल्ह्यात अतोनात नुकसान
यंदा जिल्ह्यात अतिृष्टीने खरीपाचे अतोनात नुकसान झाले. 666.मि.मी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या बीड जिल्ह्यात तब्बल 933 मि.मी.पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील 7 लाख 72 हजार 286 हे.पैकी 5 लाख 24 हजार 212 क्षेत्र हेक्टर बाधीत झाले आहे. या सर्व क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण होत आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जून ते सप्टेबर या कालावधीत मोठी जीवितहाणी झाली असून वीज पडून चौघांचा तर पुरात वाहून गेल्याने 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त अन्य कारणाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच 8 जण जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून मृत्यू झालेल्या 13 जणांच्या वारसांना शासकीय मदत वितरीत केली गेली आहे. अतिवृष्टीने पशुधनालाही हाणी पोहचवली. लहान मोठी ओढकाम करणारी अशी एकुण 233 जणावरे मार्च ते सप्टेबर या कालावधीत मृत्यूमुखी पडली तर 16 सप्टेबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत आणखी 232 जणावराचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाने याची नोंद घेतली आहे. या सार्या नुकसानीबरोबरच जिल्ह्यात जून, ऑगस्ट, सप्टेबर या तीन महिन्यात 1826 घरांची पडझड झाली. 298 झोपड्या नष्ट झाल्या. 10 ठिकाणच्या गोठ्यांच्याही नुकसान झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले असून प्रशासनाकडून आता यासाठीच्या अनुदान मागणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रेकर यांचा आजचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
Leave a comment