जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस; शेतपिकांचे अतोनात नुकसान
बीड | वार्ताहर
पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे माजलगाव धरणात पाण्याची आवक वाढलेली असल्यामुळे, प्रकल्पातून सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आलेला आहे.
सद्यस्थितीत आज 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. सांडव्यातुन ८०५३४ क्यूसेक विसर्ग सिंदफना नदीपात्रात सुरु आहे. तथापि, पाउस व त्यामुळे धरणात होणारी पाण्याची आवक, यानुसार विसर्गामध्ये वाढ करण्यात येवू शकते.
तसेच सध्या माजलगाव धरण व पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने, 'धरणात येणारे सर्व पाणी सिंदफना नदीपात्रात सोडावे लागणार असल्यामुळे सिंदफना व गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा महसूल प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
मांजरा धरणाचे पहिल्यांदाच सर्व १८ दरवाजे उघडले
केज व अंबाजोगाई तालुक्यात २३ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारपासून तर अधिकच धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यातील ओढे, नद्या क्षमतेबाहेर वाहत असून अनेक गावात पाणी शिरले आहे. बहुतांशी गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची तर गिणतीच राहिली नाही. अखंडित पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने मंगळवारी पहाटे धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मांजरा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्याची गेल्या अनेक दशकातील ही पहिलीच वेळ आहे.
Leave a comment