मांजरसुंबा-नेकनूर मार्गावरील घटना
नेकनूर । वार्ताहर
कर्तव्यावर जाण्यासाठी उशिरा झाल्याने नेेकनूर पोलिस ठाण्याचे लेटर घेण्यासाठी जाणार्या सैनिकाच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात सैनिकासह त्यांच्या मित्राचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.23) सायंकाळी 6.45 वाजता मांजरसुंबा- नेकनुर रस्त्यावरील रविंद्र धाब्यासमोर घडली.या घटनेने खंडाळा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, उमेश अभिमान सिरसाट (37), विष्णु शंकर काटे (दोघे रा.खंडाळा) अशी मयतांची नावे आहेत. उमेश अभिमान सिरसाट हे सैन्य दलात कार्यरत होते.सध्या ते बेळगाव(कर्नाटक) येथे कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी ते सुट्टी घेवून गावी आले होते; मात्र सुट्टी संपूनही ते कर्तव्यावर हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना नेकनूर ठाण्यातून एक पत्र घेणे गरजेचे असल्याने ते घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी त्यांच्या मित्रासह दुचाकीवर जात होते. मांजरसुबा- नेकनुर रसत्यावरील रविंद्र धाब्यासमोर त्यांच्या दुचाकीला (क्र.एम.एच.14-बी.ई-9542) भरधाव कारने (एम.एच.13-सी.एस.8069) पाठीमागून जोराची धडक़ दिली. या भीषण अपघातात फौजीसह त्यांचा मित्र जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नेकनूर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मुस्तफा शेख, राठोड, सोनवणे, पवार, राऊत, अनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने खंडाळा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a comment