डॉक्टर,परिचारिकांचे परिश्रम; सरकारी रूग्णालयाबद्दल वाढतोय विश्वास
बीड | वार्ताहर
येथील जिल्हा रूग्णालयाचे स्थलांतर जुन्या इमारतीत होताच
पहिल्यांदाच दुर्बिणीद्वारे दोन गंभीर शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी स्वताः शस्त्रक्रिया केली. तसेच रूग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनीही या दोन शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. दिवसेंदिवस सुविधा व उपचार दर्जेदार मिळत असल्याच्या भावना सामान्यांमधून व्यक्त होत आहेत.
बीड शहरातील एका २० वर्षीय महिलेला अपेंडिक्सचा त्रास होता.याबाबत ती महिला जिल्हा रूग्णालयात आली. येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी तिची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.त्यांनीही होकार देताच १४ सप्टेंबर रोजी सकाळी या महिलेला शस्त्रक्रियागृहात घेण्यात आले. येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे उपस्थित होते. त्यांनी स्वत:ही शस्त्रक्रिया आपल्या टीमच्या सहकार्याने यशस्वी केली. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी सकाळी एका ३० वर्षीय महिलेला पित्ताशयाच्या पिशवीचा त्रास होता. तिचीही दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
या टीमने घेतले परिश्रम
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, डॉ. अभिषेक जाधव , डॉ.माजेद, डॉ.शापे , डॉ . संदीप पाटील , डॉ.श्रीकांत मोराळे , डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण , डॉ.राम आवाड , अधिसेविका रमा गिरी संगिता दिंडकर , ओटी इन्चार्ज जयश्री उबाळे , परिचारीका मिता लांबोरे, शिपाई श्रीराम माने आदींनी परिश्रम घेतले.
गर्भपिशवी शस्त्रक्रियाही दुर्बिणद्वारे करण्याचा संकल्प
जिल्हा रूग्णालयात दिवसेंदिवस सुविधा व उपचार दर्जेदार दिले जात आहेत. मागील दोन दिवसांत दोन गंभीर शस्त्रक्रिया पहिल्यांदाच दुर्बिनद्वारे यशस्त्री केल्यानंतर आता भविष्यातही गर्भ पिशवी शस्त्रक्रियाही दुर्बिणीद्वारे करण्याचा संकल्प असल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिली. नागरिकांनीही सर्व सुविधांचा लाभ घ्यावा , असे आवाहनही डॉ साबळे यांनी केले आहे.
शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचीही उपलब्धता
जिल्हा रूग्णालयात दुर्बिण उपलब्ध नाही. परंतू रूग्णांची मागणी पाहता डॉ.सुरेश साबळे व सर्जन डॉ.अभिषेक जाधव यांनी सर्व साहित्य उपलब्ध केले. त्यामुळेच या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या.
Leave a comment