हिम्मत असेल तर कार्यकर्त्यां ऐवजी स्वतःच्या किंवा भावाच्या नावाने पत्रके काढा

 

बीड । वार्ताहर

विधानसभा निवडणुकी अगोदर कोट्यावधी रुपयांच्या आमिषाला बळी न पडणार्‍या शेकडो स्वाभिमानी कार्यकर्त्यांचे नेतृत्व करणारे तुम्ही, जेव्हा आमदार झाल्यानंतर 5 आणि 10 टाक्यांमध्ये स्वतःचं इमान विकू लागले, हा वाडी वस्ती पासून शहरातील गल्ली बोळा पर्यंतच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा अपमान नाही का? खबरदार इथून पुढे मॅनेजची भाषा कराल तर तुमच्या मुंबई पासून ते बीडच्या रेस्ट हाऊस पर्यंतच्या मॅनेजमेंट ची सगळी सिस्टीम जगजाहीर करु. आमदार साहेब कुठपर्यंत गरीब कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणार? आमदार झाल्या नंतर तरी कार्यकर्त्यांचा वापर करण्याचे बंद करा, आतातरी स्वतःच्या किंवा भावाच्या नावाने पत्रके काढा. जरा मागची दोन वर्षे आठवा, जवळच्या कार्यकर्त्यांचा गेम करण्यात, त्यांना त्रास देण्यात, कार्यकर्ता कार्यकर्त्यां मध्ये भांडण लावण्यात तुमची दोन वर्षे वाया गेली. याचं तुम्हाला दुःख नसेलही पण झोपेत धोंडा पडल्याची, घोर फसवणूक झाल्याची आमच्यासारख्या शेकडो सामान्य कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, आम्ही राजकारणात काही पथ्य पाळतो. विनाकारण आम्हाला अंडं-पिल्लं बाहेर काढायला लावू नका, तुम्हाला ठाऊक आहे आम्ही कधीही सबळ पुराव्या शिवाय बोलत नाही, त्यामुळे विनाकारण तुमच्या वैयक्तिक बाबींबद्दल बोलायला मजबूर करू नका असे सडेतोड पत्रक गटनेते फारूक पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, राहिला विषय शहरातील सन 2012-13 ला मंजूर असलेल्या रस्त्यांचा तर सुभाष रोड, सिव्हिल हॉस्पिटल, भाजीमंडई, रिपोर्टर भवन आदी भागातील सिमेंट रस्त्यांची कामे तर आम्ही उभा राहून कशा पद्धतीने करून घेतली हे एकदा त्या भागातील नागरिकांना जाऊन विचारा ते तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतील. त्यावेळी तुमचे उपाध्यक्ष बंधू काय करत होते हे आम्हाला सांगायला भाग पाडू नका. कोविड कार्यकालात जिल्हा रुग्णालयाचे पर्यटन क्षेत्र करून फोटोसेशन करणारांनी कोविड विषयी भाष्य करू नये. कोरोना बाधित रुग्णांसाठी कोणी काय केलं याचा लेखाजोखा जनताजनार्दनाकडे आहे.
आमदार साहेब,आम्ही अभ्यास केल्यामुळेच तुम्हाला फुकट आमदारकीची फळे चाखायला मिळाली हे बीड मतदारसंघा सोबतच जिल्हा मान्य करेल. आता राहिला विषय तुमच्या अभ्यासाचा तर तुम्ही एखाद्या कामाची प्रशासकीय मान्यता अगोदर घ्यावी लागते का तांत्रिक मान्यता अगोदर घ्यावी लागते याचाच अगोदर अभ्यास करा. किमान स्वतःच्या सहीने दिलेले पत्र तरी तुम्ही कधी वाचलंय का? आणि हो किती अभ्यासू आमदार आहे हे बीड प्रशासनातील अधिकारीच आपल्या कार्यकर्त्यांसहित लोकांना सांगत आहेत. आमदार साहेब, कायद्याचा वापर शहरातील विकास कामे करण्यासाठी करा, अडवण्यासाठी नको तुम्हाला हा आमचा फुकटचा सल्ला.
आमदार साहेब, नगरपरिषदेचा अधिनियम 1963 की 1965 याचा अगोदर अभ्यास करा, जिल्हा नियोजनाच्या बैठकीत मध्ये व आपल्या फेसबुक पोस्टवर आपण अधिनियम 1963 स्पष्ट उल्लेख केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. राहिला विषय नगरपालिकेच्या अर्थसंकल्पाचा तर शहरातील विकासकामांवर निर्णय घेण्याचा अधिकार हा सभागृहाचा असतो. सभाग्रह सर्वोच्च आहे. नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अन्वये पालिकेला विकास कामे कशा पद्धतीने करता येतात हे जरा तुम्हाला पालिकेचा अधिनियम शिकवणार्‍या झारीतील शुक्राचार्याला सुद्धा विचारा किंवा वाचायला सांगा. लोकांमध्ये जाऊन पहा विधानसभेला आपली फसवणूक झाल्याची भावना लोक व आपले कार्यकर्ते तोंडावर बोलून दाखवत आहेत. कार्यकर्ता हताश आहे, आज पर्याय नसल्यामुळेच फक्त तो तुमच्या सोबत शरीराने आहे मनाने नाही, वेळ आल्यानंतर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे असे आपलेच कार्यकर्ते खाजगीत बोलतात. आम्ही शहरातील लोकांना बांधील व लोकहिताच्या कामात व्यस्त आहोत. तुम्ही तेवढं अभ्यास करून अगोदर स्वतःच्या घरासमोरील रस्त्याचं बघा असेही शेवटी गटनेते फारुख पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


 

टक्केवारी पुढे आमदार साहेब, तुम्ही काकू-नाना विकास

आघाडी स्थापन करण्याचा मूळ उद्देश विसरलात!

 आमदार साहेब, कोट्यावधी रुपये आणल्याचा आव आणण्यापेक्षा व नुसताच मंत्र्यांसोबत फोटो छापून आणण्यापेक्षा अगोदर फक्त तुमच्या घरासमोरील रस्ता व तुम्ही रहात असलेल्या वॉर्डातील कामे करून दाखवा. सत्तेचा दुरुपयोग करून प्रशासनातील अधिकार्‍यांवर दबाव आणून मतदार संघातील विकास कामे अडवण्यापेक्षा त्याचा उपयोग लोक कल्याणासाठी करा. तुमचे दोन वर्ष शहरातील कामे अडवण्यात आणि दहा,पाच घेऊन पुन्हा सुरू करण्यात वाया गेली. ज्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून व जिवावर उदार होऊन तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केला तेच कार्यकर्त्ये आज तुम्हाला नको आहेत, शेवटी जिवाभावाच्या लोकांवर सूड उगवलात. हे सर्व जनता जनार्दनाच्या न्यायालयात सुरू आहे, आता जनताच याचा न्याय करेल असे गटनेते फारुख पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.