म्युकरची रुग्णसंख्या दोनशेच्या उंबरठ्यावर
जिल्ह्यात एकाचा मृत्यू; 196 नवे रुग्ण
बीड । वार्ताहर
जल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज बुधवारी (दि.14) जिल्ह्यात कोरोनाचे नवे 196 रुग्ण निष्पन्न झाले. यात 22 रूग्ण 18 वर्षाखालील आहेत. तसेच एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली तर 124 रुग्ण कोरोनामुकत झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे. नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसुन आले आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील 5 हजार 237 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 196 पॉझिटिव्ह तर 5 हजार 41 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 8, आष्टी 46, बीड 45, धारुर 8, गेवराई 27, केज 10, माजलगाव 8, परळी 2, पाटोदा 21, शिरुर 12 आणि वडवणी तालुक्यातील 9 जणांचा समावेश आहे. चोवीस तासात एका मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात कासेवाडी (ता.आष्टी) येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण मृत्यूचा आकडा 2 हजार 565 झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 94 हजार 133 इतकी झाली असून यापैकी 90 हजार 297 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 1 हजार 271 रुग्ण उपचाराधिन आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
म्युकरची रुग्णसंख्या दोनशेच्या उंबरठ्यावर
दरम्यान, म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराच्या रुग्णसंख्येला काही दिवसांपासून स्थिर होती. मात्र, मंगळवारी आणखी चार रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 197 इतकी झाली आहे. यापैकी 78 जण उपचार घेऊन बरे झालेतर 73 जणांवर उपचार सुरु आहेत. 34 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
बेफान गर्दीमुळे वाढतोय कोरोना!
जिल्ह्यात सध्या दुपारी चार वाजेपर्यंत बाजार पेठा सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. याशिवाय आठवड्याच्या दर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने पुर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश आहेत. असे असले तरी हे नियम केवळ कागदावरच दिसत आहे. विकेंड लॉकडाऊन कालावधीतही अनेक ठिकाणी बाजार पेठ सुरु असल्याचे चित्र दिसुन येत आहे. भाजीमंडईत रोज होणारी गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरत आहे. वास्तविक शहरातील भाजी विक्रेत्यांना विविध भागात सामाजिक अंतर ठेवून भाजीपाला विक्रीची परवानगी गतवर्षीच देण्यात आली आहे. परंतू त्यानंतरही एकाच ठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातही प्रशासनाचे कोरोना संबंधीचे नियम दुकानदारांकडून पायदळी तुडवले जात आहे. रात्री उशीरापर्यंत दुकाने सुरु ठेवली जात आहे. त्यामुळे सहाजीकच लोक खरेदीच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडत आहेत. जिल्हा प्रशासनाकडूनही पुर्वीप्रमाणे नियमाची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. प्रभारी अधिकार्यांवर जिल्ह्याचा गाडा सुरु आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांमध्यें शिस्त निर्माण करण्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने नियम अधिक कठोर करुन त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Leave a comment