सातबार्यासाठी आता तलाठ्यांकडे जाण्याची गरजच नाही
बीड । वार्ताहर
सन 2021-22 साठी बीड जिल्हा बँकेस खरीप हंगामासाठी 208 कोटी व रब्बी हंगामासाठी 52 कोटी असे एकूण 260 कोटीचे उदिष्ट देण्यात आले आहे. बँकेने 29 मे अखेर खरीप हंगामात 619 सभासदांना 4 कोटी 13 लाखांचे कर्ज वितरितही केले आहे. दरम्यान बँकेने जमाबंदी आयुक्तालयाशी करार करुन शेतकर्यांना डिजीटल स्वाक्षरीत ‘सात बारा’ व ‘आठ अ’ संगणकीय प्रणालीव्दारे तालुका शाखा स्तरावर सुविधा उपलब्ध करुन दिली असून आता डिक्लरेशन (इकरार) पत्रावर तलाठी यांची स्वाक्षरी घेण्याची सुध्दा आवश्यकता नसल्याच्या सुचना सर्व शाखांना दिल्या असल्याची माहिती बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाठक यांनी दिली. तसेच खरीप आढावा बैठकीमध्ये जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे व शासनाने जिल्हा बँकेस पिक कर्ज वाटपाचे दिलेले उदिष्ट पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डिसीसी बँकेच्या नुतन प्राधिकृत अधिकारी समितीचे अध्यक्ष म्हणुन विभागीय आयुक्त कार्यालयाचे अप्पर आयुक्त अविनाश पाठक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, सनदी लेखापाल जनार्धन रणदिवे, सहकारी संस्थेचे सहा.निबंधक अशोक कदम,अॅड.अशोक कवडे यांनी पदभार स्विकारुन कामकाजास सुरुवात केली आहे. बँकेच्या प्राधिकृत अधिकारी समितीने ठेवीदारांना बँकेत ठेवी ठेवण्याचे आवाहन केले असून बँकेतील 5 लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असल्याची माहिती पाठक यांनी दिली. तसेच नवीन ठेवीदारांना बँक बँकींग व्यवहारासाठी डेबिट कार्डसह एसएमएस सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.यापुढे कर्जदारांचा डाटा सीबीलवर अपलोड करण्यात येणार असून कर्जदारांनी सीबील क्रेडिट खराब होवू नये याची दक्षता घेण्यासाठी थकित कर्जाचा भरणा तातडीने करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले. बँकेच्या दैनदिन कारभारात पारदर्शकता व विश्वासाहर्ता निर्माण करण्यासाठी नुतन प्राधिकृत अधिकारी समिती तत्पर असल्याचेही पाठक यांनी सांगितले.
विमा योजनेचाही शेतकर्यांना मिळणार लाभ
प्रशासक मंडळाने खरीप हंगामाचे पिक कर्ज वाटप करतांना उद्दिष्ट पुर्तीसह शेतकर्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे यामध्ये जीवन ज्योती विमा योजनेत शेतकरी सभासद वयाच्या 18 ते 50 वर्षांपर्यंत वार्षिक 330 रु तसेच प्रधानमंत्री सुरक्षा योजनेच्या सभासदांचे व 18 ते 70 वर्षे असून या योजनेत सहभागी होणार्या शेतकर्यांना वार्षिक हप्ता रु.12 असुन विमा धारकाचा अपघाती मृत्यु झाल्यास वारसास दोन्ही योजने मधून पात्र विमा धारकाला रु.2 लाख एवढी विमा रक्कम मिळणार आहे. या विमा योजनेचा लाभ कर्ज वाटप करतेवेळी शेतकर्यांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहितीही प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाठक यांनी दिली.
Leave a comment