वॉर्डात घाणीचे साम्राज्य; रुग्णांचे आरोग्य धोक्यात
बीड । वार्ताहर
जिल्हा रुग्णालयामध्ये प्रशासन नावाची बाब कुठेही शिल्लक राहिली नसून वैद्यकीय अधिकारी ते सफाई कामगार हे सर्वच कर्मचारी आणि अधिकारी आपल्या मनाला वाट्टेल तसे वागू लागले आहेत. जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांचेच मूळात जिल्हा रुग्णालयाकडे पुर्णत: दुर्लक्ष असल्याने रुग्णालयाची यंत्रणा पुर्णत: ढेपाळली आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही, जेवण वेळेवर मिळत नाही, अपमानास्पद वागणूक दिली जाते या तक्रारींबरोबरच रुग्णालयातील विशेषत: सर्वच कोव्हिड वार्डात घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी येवू लागली आहे.अनेक कोरोना रुग्णांनी यासंदर्भात तक्रारी करुनही कोणीही लक्ष दिलेले नाही. आता आपले पाप झाकण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर काढण्याची शक्कल डॉ.सूर्यकांत गित्तेंनी लढवली आहे. उपचार वेळेवर केले असते तर मृत्यू झाकण्याची वेळ आली नसती. आता तर रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून नव्याने कंत्राटी भरती करण्यात आलेले वॉर्डबॉय बिलकूल काम करत नसल्याने जुन्या कर्मचार्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून त्याचा परिणाम सार्वजनिक स्वच्छतेवर झाला असून नव्याने भरती केलेल्या कर्मचार्यांनी या रुग्णालयाचा अक्षरक्ष: उकंडा करुन टाकला आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर यंत्रणा ढासळणे अपेक्षित होते. 200 रुग्णांची व्यवस्था असणार्या रुग्णालयात 600 रुग्ण उपचार घेत असतील तर नक्कीच ओढाताण होणार, परंतु त्यातही उपलब्ध मनुष्यबळाकडून काम करुन घेणे हे अधिकार्यांचे कौशल्य असते. ते कौशल्य डॉ.अशोक थोरात यांनी गेल्यावर्षी कोरोना संकटात दाखवले होते मात्र सूर्यकांत गित्ते यांनी गेल्या चार महिन्यात एकही चूणूक दाखवलेली नाही. कर्मचार्यांना घरी बसवण्याची धमकी देण्याशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मर्जीतले असल्याने त्यांच्या विरोधात सर्वत्र बोंब होत असली तरी परिणाम काहीही झालेला नाही हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. जिल्हा रुग्णालयात जी कर्मचारी भरती करण्यात आली आहे. त्यातील 70 टक्के कर्मचारी हे रुग्णालयात काम करणार्या जुन्या कर्मचार्यांच्या परिवारातील किंवा नातेवाईक आहेत. या भरतीमध्ये देखील देवाण-घेवाण करुनच कंत्राटी कामगार नियुक्त केलेले आहेत. त्यामुळे हे कर्मचारी कोणाचेही ऐकत नाहीत. जुन्या लोकांनी या नव्या कर्मचार्यांना अधिकार्यांचे ऐकून घ्यायचे आणि पुढे चालायचे असा कानमंत्र दिला आहे. वशिला लावून भरती झाल्याने हे कर्मचारी कोणालाही भित नाहीत. विशेष म्हणजे जी कोव्हिड भरती करण्यात आली त्यामध्ये सफाई कामगार भरले गेलेच नाहीत. वॉर्डबॉय म्हणूनच भरती झाली आणि नव्याने भरती करण्यात आलेले वॉर्डबॉय कसलेही काम करत नाहीत, त्यामुळे जुन्याच लोकांवर ताण पडत आहे. एकंदरीतच रुग्णालयामध्ये नर्सिंग वार्ड असेल किंवा इतर वॉर्डामध्ये, या वॉर्डातील स्वच्छतागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून वॉर्डातील पलंगावरील गाद्या, त्यावरील बेडशिट याला दुर्गंधी येवू लागली आहे. यामुळेदेखील काही रुग्णांना संसर्ग झाला असून कोरोनात अजुन इतर आजारांनाही रुग्णांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रकाराकडे वारंवार तक्रारी करुनही डॉ.सूर्यकांत गित्ते, डॉ.सुखदेव राठोड हे दुर्लक्ष करीत असून आता जिल्हाधिकार्यांनीच या प्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
इन्चार्ज घरी बसून हाकतात कारभार
कोव्हिड वॉर्डसाठी इन्चार्ज सिस्टरची नियुक्ती केली गेली आहे. जवळपास वीस वर्षापेक्षा अधिककाळ रुग्णालयात नौकरी केलेल्या सिस्टरांकडे प्रत्येक वॉर्डची जबाबदारी देण्यात आली आहे. पाच वॉर्डसाठी पाच इन्चार्ज सिस्टर नियुक्त केल्या आहेत, मात्र या इन्चार्ज घरी बसून कारभार हाकत आहेत. रुग्णालयात कोणी येणार असेल तर कीट घालून हजर राहतात. ऐरवी कर्मचार्यांना मोबाइलवरच सूचना देवून काम करतात आणि वॉर्डातील फोटो मोबाइलवर मागवून घेतात. हा प्रकार डॉ.सूर्यकांत गित्तेंना माहित असूनही ते कारवाई का करत नाहीत? हा खरा प्रश्न आहे.
मुकादमांकडूनही वसूली
जिल्हा रुग्णालयामध्ये गव्हाणे, सोनट्टके आणि शेरु हे तीन मुकादम कर्मचार्यांच्या ड्युटी लावण्यासाठी नियुक्त केलेले आहेत. चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्यांच्या ड्युट्या कुठे लावायच्या, याची जबाबदारी या तिघांवर असून हे तिघेही सीएस गित्ते आणि सुखदेव राठोड यांची दिशाभूल करुन कर्मचार्यांकडून पैसे घेवून ड्युट्या लावत असल्याचा आरोप सफाई कामगार करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हेच मुकादम कार्यरत असून त्यांची मुजोरी देखील वाढली आहे. या प्रकाराकडे कोण लक्ष देणार?. सीएस गित्तेंना देणे-घेणे नाही. चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्यांनी अनेकेवळा हा प्रकार गित्तेंच्या कानावर घातलेला आहे. मात्र कारवाई काहीही झालेली नाही.
डॉ.अशोक थोरातांची आठवण येवू लागली!
रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि कर्मचार्यांवर जरब यामुळे डॉ.अशोक थोरात यांनी जिल्हा रुग्णालयाला शिस्त लावली होती. गतवर्षी कोरोना संकटात काही गैरप्रकार घडले मात्र रुग्णांचे हाल झाले नाहीत. स्वच्छतेच्या बाबतीतही रुग्णालयाची अवस्था बर्यापैकी होती. मेडिसिन वाटपात गोंधळ नव्हता, कर्मचारी नेमून दिलेले काम करत होते, मात्र आज पूर्ण उलट परिस्थिती आहे. त्यामुळे दवाखान्यातील जुन्या कर्मचार्यांना, नर्सिंग स्टाफला डॉ.अशोक थोरात यांची प्रकर्षाने आठवण येवू लागली आहे.
सिनियरने काम करायचे अन् ज्युनियरने बसायचे!
जिल्हा रुग्णालयातील अवस्था कशामुळे बिघडली? याचे उत्तर नव्याने भरती झालेले लोक कामच करत नाहीत हे आहे. 25 वर्षांपासून काम करणार्या सफाई कामगारांना आजही तेवढेच काम करावे लागते. यातील 50 टक्क्यापेक्षा जास्त कर्मचारी दोनवेळेस ड्युट्या करतात. वॉर्डामध्ये सिनियर असलेले हे काम करतात आणि नव्याने घेतलेले ज्युनियर मोबाइलमध्ये व्यस्त असतात. याचे छायाचित्र देखील काही जुन्या लोकांनी सीएस गित्तेंना मोबाइलवर पाठवले, त्याकडेदेखील त्यांनी दुर्लक्ष केले.
Leave a comment