बीड,अंबाजोगाई, माजलगावमध्ये रुग्ण वाढू लागले
बीड । वार्ताहर
कोरोनापाठोपाठ राज्यभरात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे रुग्ण वाढू लागले असतानाच बीड जिल्ह्यातही मागील पाच दिवसांपासून या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये 15 रुग्ण उपचार घेत आहेत. बीड जिल्हा रुग्णालयात 6 रुग्णांवर उपचार करण्यात आले यातील 4 रुग्ण पुढील उपचारासाठी औरंगाबादला पाठवले गेले आहेत तर 1 रुग्ण बरा झाला आहे. दरम्यान म्युकरमायसोसिसमुळे अंबाजोगाईत 1 तर बीडमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या आजाराचे रुग्ण वाढत असताना जिल्हा प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे. आरोग्य प्रशासनामध्ये देखील यामध्ये गाफीलपणाच दाखवला आहे. कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे म्युकरमायसोसिससाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळला, त्यानंतर दोन दिवसातच पहिला रुग्ण अंबाजोगाईत आढळला. त्यावर उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर बीडमध्ये एका महिलेला या आजाराने ग्रासले आणि त्यातच त्या महिलेचा मृत्यू झाला. गेल्या दोन आठवड्यात स्वारातीलमध्ये 15 रुग्ण उपचार घेत आहेत. बीड जिल्हा रुग्णालयातील या आजाराच्या रुग्णांची माहिती घेतली असता गेल्या दोन आठवड्यामध्ये जवळपास 6 रुग्ण आढळल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगीतले. दरम्यान यातील 4 रुग्णांना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. कोरोनानंतर म्युकरमायकोसिस हा आजार मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये दिसून येत असून विशेषत: मधूमेह असलेल्या आणि पोस्ट कोव्हिडच्या रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे जाणवू लागतात. वेळीच उपचार न मिळाल्याने म्युकरमायकोसिसची लक्षणे वाढत जातात. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण असूनही लोकांना या आजाराची माहिती नसणे आणि वेळेवर उपचार न मिळणे यामुळे दिवंसेदिवस धोका वाढू लागला आहे.
वास्तविक पाहता राज्यात म्युकरमायकोसिसचा रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या संदर्भात दखल घेणे गरजेचे होते. बीड जिल्हा रुग्णालय, स्वाराती अंबाजोगाई या दोन्ही रुग्णालयात नेत्रतज्ञ आहेत. त्यांची एक समिती बनवून स्वतंत्र कक्ष कार्यान्वीत करणे आवश्यक होते; मात्र बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी यासंदर्भात कसलीही दखल घेतलेली नाही अथवा जिल्हा प्रशासनाला आवश्यक बाबींची माहितीही दिली नाही. स्वारातीमध्ये मात्र अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांनी तातडीने कक्ष सुरु करत रुग्णांवर उपचार सुरु केले. एवढेच नव्हे तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही या संदर्भात अवगत केले.
मधुमेहाच्या रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर, स्वतःच्या शरीरातील साखर वाढू दिली नाही तर हा आजार होत नाही, लक्षणे दिसू लागताच जर रुग्ण डॉक्टरांकडे गेला तर तो नुसत्या औषधांनी बरा होऊ शकतो.त्रास वाढू लागला तर औषध व ऑपरेशन या दोन्हीच्या साहाय्याने या रुग्ण वाचू शकतो. हा आजार संसर्गजन्य नाही असे नेत्रविकार तज्ञांनी सांगीतले आहे.आयसीयूमध्ये ऑक्सिजन देण्यास जे पाणी वापरले जाते ते डिस्टिल्ड वॉटर असले पाहिजे. त्याशिवाय नाकामध्ये बिटाडीन टाकणे, स्टेरॉइडचा कमीत कमी वापर करणे या गोष्टी बारकाईने केल्या पाहिजेत. रुग्ण कोरोनामधून बरा झाल्यावर तीन ते चार आठवड्यांनी हा आजार होण्याचे प्रमाण समोर येत आहे. रेमडेसिविर व स्टेरॉईडचा वापर याचे साइड इफेक्ट रुग्णांवर होत असतात.
स्टेरॉईडमुळे धोका वाढला
रुग्णांना 9 दिवसांपेक्षा जास्त काळ स्टेरॉईड दिले असेल आणि रुग्ण मधुमेही असेल तर त्यांना हा काळ्या बुरशीचा आजार दिसत आहे. स्टेरॉईडबद्दल डॉक्टरांच्या मनात आस्था असते. कारण ते मृत्यूच्या दारातल्या रुग्णाला परत आणू शकते. पण चांगल्या रुग्णाला मृत्यूच्या दारात नेऊ शकते हे लक्षात घेऊन स्टेरॉइडचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यामध्ये पाचपेक्षा कमी स्कोअर असणार्यांदेखील रेमडेसिवीर दिले जात आहे. काही खासगी रुग्णालयात तर रेमडेसिवीर देण्याचा धडाकाच सुरु आहे. त्यामुळेच अशा आजारांचा धोका वाढला आहे.
आ.संजय दौंड यांनी दिले दिड कोटी
म्युकरमायकोसिस आजाराचे निदान करणार्या अद्ययावत मशिनरीच्या खरेदीसाठी आ.संजय दौंड यांनी आपल्या निधीतून दोन आठवड्यापूर्वीच दिड कोटी रुपये दिले आहेत. जिल्हाधिकार्यांनी या पत्राला मंजुरीही दिली आहे. मात्र ‘शासनाचे काम अन् सहा महिने थांब’ या पध्दतीनेच संबंधित मशिन खरेदीसाठी प्रशासकीय प्रक्रिया चालू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून साधारणत: पंधरा दिवसांनतर मशिन खरेदी केली जाईल असे सांगीतले गेले.
Leave a comment