रविवारी दिनांक 16 मे 21 रोजी सायंकाळी चार ते साडेपाच या काळात झूम मिटिंग वर ऑनलाईन व्याख्यान
सध्या कोरोनाच्या या लाटे बरोबरच एक सुप्त लाट आहे ,जिचा ऊहापोह सध्या केला जात नाही. ही लाट आहे विविध भावनांची.
जर आपण कोरोना वॉर्डमध्ये चक्कर मारली, तर कित्येक लोकांचे दुःख आपल्याला अंतर्मुख करते. प्रत्येकाला वाटते माझेच दुःख मोठे आहे पण प्रत्यक्षात इतरांच्या दुःखाकडे ते खूप शुल्लक असते.
मी, डॉ. अनुराग पांगरीकर, आयएमए बीडचे सदस्य जिल्हा रुग्णालयात देत असलेल्या रूग्णसेवेचा भाग म्हणून कोरोना वॉर्डमध्ये राऊंड ला गेलो. तेव्हा एका ऍडमिट व्यक्तीने मला सांगितले की त्याच्या घरातील सर्व सहा मोठी माणसं सहा वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये ॲडमिट आहेत आणि घरात फक्त पाच-सहा वर्षांची मुलं आणि जनावरे एवढीच आहेत. त्या व्यक्तीला इतकी धाप होती की त्याला इतर वॉर्ड मध्ये ॲडमिट असणाऱ्या आई-वडील, पत्नी ,भाऊ भावजय यांना भेटायला सुद्धा जाणे शक्य नव्हते. अशा माणसाची मानसिक स्थिती काय झाली असेल?
एक 80 वर्षाचे आजोबा ऍडमिट होते.त्यांच्याबरोबर 76 वर्षांची आजी एकटीच होती. मुलं मुंबईला क्वारंटाईन. आजीला म्हणालो "आजी तुम्ही या कोरोना वॉर्डात कशाला थांबता? तुम्हाला इन्फेक्शन होईल ना."
तर आजी म्हणाल्या "इतक्या वर्षात आम्ही दोघे एकमेकांना सोडून कधीच राहिलो नाहीत. मी सोडून हे कसे राहतील? माझं काय व्हायचं ते होऊ द्या पण मी यांना सोडून जाणार नाही!"
वॉर्ड मध्ये सिस्टर एका खेड्यातील मळलेले धोतर, ठीक ठिकाणी फाटलेला पण शिवून काढलेला पांढरा शर्ट व टोपी घातलेल्या आजोबाला रागवत होत्या. कोणी आपल्याकडे पहात नाही ना हे बघून ते त्यांच्या बायकोचा मास्क सारखा बाजूला करायचे. मास्क सरकल्यामुळे आजीच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी व्हायचे .मी हळूच जाऊन आजोबांना विचारले "आजोबा असं का करता?" आजोबा म्हणाले "एकट्याने चहा कसा पिऊ? तिला चहा खूप आवडतो .माझ्या आधी चमच्याने तिला थोडा चहा पाजतो." मुलं किंवा मुली कोणीही इथे यायची हिंमत करत नाहीये.एकमेकांवर प्रेम करणारे दोघेच म्हातारे. दिवसभर आजोबा आजीची पाठ, डोकं ,पाय दाबण्याच्या सेवेत गुंतलेले .दुसऱ्या दिवशी सकाळी मी राउंड ला गेलो तर एव्हाना त्या आजी स्वर्गवासी झालेल्या.रात्री त्या आजोबांचे काय झाले असेल?माझे मन पिळवटून निघाले
प्रायव्हेट कोविड सेंटरच्या एका माझ्या मित्राचा मला सकाळी सकाळी फोन आला. "माझ्याकडचा ऑक्सिजन संपत आलाय,ऑक्सिजन सप्लायर ऑक्सिजन देईना. जर असं झालं तर माझ्याकडे काय अवस्था होईल सांगणे अवघड आहे."
पेशंटच्या नातेवाईकांच्या अपेक्षा, रेमडेसिविर चा ताण, अपुरा स्टाफ ,घरी वेळ देता येत नाही म्हणून बायका मुलांची ओरड .असाच अनुभव सर्व कोविड सेंटर चालवणारे डॉक्टरांचा आहे . ऍडमिट झालेल्या रुग्णाला आपण वाचवू शकलो नाही याचे दुःख , त्यांचे वाचवा म्हणून टाहो फोडणारे नातेवाईक ,ICU मध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मानसिक स्थिती चे वर्णन न केलेलेच बरे. सगळे अतिशय तणावात असतात . लांबून पाहणाऱ्याला वाटतं कोविड सेंटर वाल्यांची चांदी आहे. नॉन कोविड युनिट चालवणारे डॉक्टर काम नाही म्हणून त्रस्त.
कलेक्टरांच्या ऑफिसला गेलो तर दोन तासांपैकी पावणे दोन तास ते फोनवर ऑक्सिजन कुठून मिळतो या प्रयत्नात होते. आदल्या रात्री झोपले पण नव्हते.
दुकानदार मित्रांची भेट झाली तर कोविडमध्ये दुकान बंद असल्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीबद्दल चिंतित होते व कलेक्टरांच्या ऑर्डरला दोष देत होते. तर कोविड मुळे नातेवाईक गमावलेला एक मित्र आधीच का लॉकडाऊन केलं नाही म्हणून आरडाओरडा करत होता. कॉल ला आलेले मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सांगू लागले मागच्या वर्षी सेल नाही म्हणून परेशान होतो तर या वेळेस पॅरासिटॅमॉल सुद्धा स्टॉक नाही म्हणून काही करता येत नाहीये.
शाळा नसल्यामुळे घरी बसणारी मुलं जाडजूड झाली आहेत तर हातातला मोबाईल घेऊन काढून घेतला म्हणून एखादा घरामध्ये आदळआपट करत आहे .
कितीही काम केलं तरी वर्तमानपत्रात रोज डॉक्टरांविषयी येणाऱ्या नकारात्मक बातम्या व
शासनाच्या रोज रोज येणाऱ्या आदेशांना कंटाळून व त्यातील 'नाहीतर आम्ही तुमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू ' या धमकीला कंटाळून एक मित्र "मीच माझी MBBS डिग्री जाळू का?" असं विचारत होता.
कोणी नोकरी गमावली आहे, तर कोणाचं लग्न लांबले आहे. कोणाच्या जवळच नातेवाईक अथवा मित्र काळाने हिरावून नेला आहे.कोणाची साठवलेली पुंजी खर्च झाली आहे, मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे एखाद्या बापाने आई-वडिलांच्या ट्रीटमेंट मध्ये संपवले असतील. त्यांचे पुढे काय होणार आहे. असे काही कुटुंब आहेत की ज्यांनी खर्च करण्याची क्षमता नाही व सरकारी दवाखान्यात ॲडमिट होण्याची भीती वाटते म्हणून घरच्या घरी उपचार करून आजाराला सामोरे गेले असतील. त्यांच्यातील एखादा कदाचित दगावलेला असेल. एखाद्या मुलाने बापाचा अथवा बापाने मुलाचा डोळ्यासमोर होणारा मृत्यू पाहिलेला असेल आणि आपण काहीच करू शकलो नाही ही भावना कदाचित त्याला झोपू देत नसेल .तर कोणाचं आर्थिक स्थैर्य हिरावले आहे. जगण्याची सगळी अनिश्चितता झाली आहे. कोणी या भीतीने ग्रासलेला आहे की 'मला किंवा घरच्यांना तर कोरोना होणार नाही ना?'
या सर्व भावनांचे योग्य नियमन करणे गरजेचे आहे.हे लक्षात घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशन, बीड चे अध्यक्ष डॉ अनुराग पांगरीकर यांनी कळविले आहे की येत्या रविवारी दिनांक 16 मे 21 रोजी सायंकाळी चार ते साडेपाच या काळात औरंगाबाद येथील मनोविश्लेषक व समुपदेशक डॉ. संदीप शिसोदे, यांचे एक झूम मिटिंग वर ऑनलाईन व्याख्यान ठेवले आहे.
या,आपण सर्व चर्चा करूया व आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवून यातून बाहेर पडूया.
Zoom meeting id 6620701129
Passcode 112233
रविवार दा. 16/5/2021 सायं 4.00 - 5.30
https://us02web.zoom.us/j/
ही झूम मीटिंग ची लिंक 1000 लोकांना सामावणारी आहे. हा कार्यक्रम रुग्ण , डॉक्टर व सर्वांसाठी पण आहे ही माहिती आपल्या परिसरातील सर्व गरजूं पर्यंत पोहोंचवावी अशी विनंती आय. एम. ए. बीड च्या वतीने अध्यक्ष डॉ अनुराग पांगरीकर यांनी केली आहे
Leave a comment