सतर्कतेमुळे 60 रुग्णांचे वाचले प्राण
डॉक्टर, कार्यकर्ते आणि पत्रकारांनी यंत्रणा लावली कामाला
गेवराई । मधुकर तौर
गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी दुपारी ऑक्सीजनची कमतरता निर्माण झाल्याचे लक्षात आल्यानंतर धावपळ सुरु झाली. शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि रुग्णालयातील काही डॉक्टरांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि घेतलेल्या मेहनतीमुळे प्राणवायूवर अवलंबून असणार्या 60 कोरोना बाधित रुग्णांचे प्राण वाचले. नेहमीप्रमाणे याहीवेळी यंत्रणा गाफील राहिली असती तर 60 रुग्णांचे जीव या प्राणवायूअभावी गेल्याची घटना गेवराईकरांना चटका लावून गेली असती; मात्र वेळेवर सर्वकाही मिळाल्याने मोठे संकट टळले. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने यंत्रणा हलली आणि गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक तेवढा ऑक्सीजन मिळाला. जवळपास 4 तास चाललेल्या या मिशननंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.
गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये मंगळवारी दुपारी ऑक्सीजनची आवश्यकता असल्याचे पत्र सोमवारीच वैद्यकीय अधीक्षक डॉ.महादेव चिंचोले आणि डॉ.राजेश शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते, मात्र मंगळवारी दुपारपर्यंत ऑक्सीजन घेवून येणारे गेवराईत पोहचलेच नव्हते. दुपारी एक वाजता ऑक्सीजनच्या कमतरतेची चर्चा रुग्णांच्या नातेवाईकांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर घातली. रुग्ण समितीचे महेश दाभाडे व इतर कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. महेश दाभाडे, प्रशांत गोलेच्छा व त्यांच्या इतर सहकार्यांनी रुग्णालयातील एकंदर परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर 60 रुग्णांचा जीव वाचवणे आवश्यक आहे, हे त्यांचा लक्षात आले अन् तेथून पुढे धावाधाव सुरु झाली.
उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन 20 मिनिटात संपेल. 60 कोवीड रुग्ण गंभीर होऊ शकतात असे समजताच आरोग्य प्रशासन हतबल झाले. त्यांनी सदरील माहिती ही तहसीलदार सचिन खाडे यांना दिली. खाडे यांनी ही संपर्क करून ऑक्सीजनसाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर सीईओ अजित कुंभार यांना दुरध्वनीवरुन माहिती देण्यात आली ; मात्र तरीही यंत्रणा तेवढी तत्पर झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर महेश दाभाडे यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना गेवराईच्या परिस्थितीची माहिती दिली आणि तेथूनपुढे यंत्रणा कामाला लागली व दुपारी ऑक्सीजन सिलेंडर घेवून वाहन उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. त्यामुळे 60 रुग्णांचे प्राण वाचू शकले.
वरिष्ठ दाद देत नसल्याने डॉ.शिंदेंनी दिला होता राजीनामा!
उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन तुटवड्यासह आरोग्य विभागातील अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. याकडे वरिष्ठ दाद देत नसल्याने येथील विभागात कार्य तत्पर सेवा देणारे डॉ.राजेश शिंदे यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळताच, समितीचे सदस्य महेश दाभाडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, अॅड.सुभाष निकम, संजय काळे, दादासाहेब घोडके, बाळासाहेब सानप, प्रशांत गोलेछा, प्रशांत घोटणकर, संदीप मडके यांनी डॉ. शिंदे यांना संपर्क केला. मात्र, त्यांनी उपजिल्हा रुग्णालय परिसर सोडला होता. समितीने तातडीने त्यांना जय भवानी मंदिरासमोर गाठले व त्यांना सर्वांनीच त्यांना राजीनामा न देण्याची विनंती केली, त्यानंतर डॉ.शिंदे हे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी आपले काम पुर्ववत सुरु केले.
रुग्णसेवा समिती जिल्हाधिकार्यांना भेटणार
गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक त्या सुधारणा करुन रुग्णांची सोय होईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शहरातील काही विघ्नसंतोषी मंडळी ही रुग्णालयात येवून डॉक्टर आणि कर्मचार्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिस्थितीत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यांना सर्वोत्परी उपचार मिळावेत, वैद्यकीय अधिकार्यांच्या नियुक्त्त्या कराव्यात यासाठी रुग्ण सेवा समितीचे महेश दाभाडे,अॅड.सुभाष निकम,प्रशांत गोलेच्छा, प्रशांत घोटनकर, संदीप मडके, पत्रकार हे जिल्हाधिकारी जगताप यांना भेटणार असल्याचे सांगीतले.
Leave a comment