राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
पाटोदा । वार्ताहर
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध धाडी टाकण्याची मोहीम कडक केली असून बीडच्या पथकाने पाटोदा वैजाळा येथून 46 हजार रुपयांची देशी दारू जप्त केली असून आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी (दि.4) रोजी बीडच्या पथकाने पाटोदा तालुक्यातील वैजाळा शिवारात एका शेतात कडब्याच्या गंजी मध्ये लपवून ठेवलेला देशी दारुचा साठा जप्त केला. तसेच आरोपी निलेश भागवत येडे (27, रा.वैजाळा, ता.पाटोदा) याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 768 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. जप्त केलेल्या दारूची किंमत 46 हजार 80 रुपये इतकी आहे. सदर कारवाई दुय्यम निरीक्षक शेळके, राठोड, घोरपडे व जवान अमीन सय्यद, मोरे व वाहन चालक जारवाल व शेळके यांनी केली.
तसेच अंबाजोगाई पथकानेही दिंद्रुड ठाणे हद्दीत मंगळवारी तेलगाव येथून दामोदर माणिक चव्हाण या इसमाच्या ताब्यातून विदेशी मद्याच्या एकूण 480 बाटल्या जप्त केल्या असून त्याची किंमत 69 हजार 690 रुपये इतकी आहे जप्त केला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील हातभट्टी ठिकाणे, रोड लगत असलेले धाबे, हॉटेल, खानावळी इत्यादीची सातत्याने तपासणी करण्यात येत असून अवैध मद्याची विक्री किंवा निर्मिती होत असल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नितीन धार्मिक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड यांनी दिला आहे.
Leave a comment