जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयाच्या कर्मचार्यांवर संशय
बीड । वार्ताहर
जिल्हा प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत नियोजन लावले असले तरी रेमडेसिवीरची टंचाई कमी झालेली नाही. चार दिवसानंतर एका रुग्णाला रेमडेसिवीर भेटू लागल्याने या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काळ्याबाजारात विकले जाणारे रेमडेसिवीर हे बोगस असून ते रुग्णांच्या नातेवाईकांनी खरेदी करु नये. कारण यापूर्वीच रेमडेसिवीरच्या बाटलीमध्ये पाणी भरुन विकण्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला होता. शहरातील खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु असून पंचवीस ते 30 हजार रुपयांपर्यंत रेमडेसिवीरची विक्री केली जात आहे. हा प्रकार प्रशासनाने थांबवावा अशी मागणी होत आहे. डुप्लीकेट रेमडेसिवीरमुळे रुग्णांची व नातेवाईकांची फसवणूक करुन पैसे कमवणारी टोळी खासगी रुग्णालयात सक्रीय असल्याची चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची परिस्थिती बीड शहरात निर्माण झाली आहे. अनेक रुग्णांना हे इंजेक्शन वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एकीकडे रेमडेसिवीर वापरु नका असे सांगीतले जात असताना दुसरीकडे मात्र बीड शहरात खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. न्युमोनियाचा स्कोअर सहा पेक्षा कमी असला तरी रेमडेसिवीर दिले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील डॉक्टरांनी रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात वापर करु नये, ते शरिराला किती घातक आहे हे वैद्यकीयदृष्ट्या पटवून दिले होते. रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने प्रशासनाने अन्न व औषध प्रशासनाकडून हे नियोजन उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांच्याकडे दिले. नोंदणीप्रमाणे इंजेक्शनचे वाटप होवू लागले असले तरी काही रुग्णांना आवश्यक असूनही चार-चार दिवस इंजेक्शन मिळत नाही, त्यामुळे अशा रुग्णांचे नातेवाईक काळ्याबाजारातून रेमडेसिवीर विकत घेतात. मात्र हे रेमडेसिवीर कंपनीचेच आहे याबद्दल कोणीही खात्री देत नाही. त्याहीपेक्षा महत्वाचे हे की, ज्या रुग्णालयात रुग्ण अॅडमिट आहे, त्या रुग्णालयातील कर्मचारीच इंजेक्शन ज्यादा पैसे घेवून उपलब्ध करुन देत आहेत. मात्र या इंजेक्शनमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची मात्रा आहे की अजून दुसरे काही हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे काळ्या बाजारात मिळणारे रेमडेसिवीर घेवू नका असे आवाहन करण्यात आले आहेे.
खासगी रुग्णालयात रॅकेट
शहरातील ज्या रुग्णालयात कोव्हिड सेंटर चालवले जातात, त्या रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी, पॅथालॉजी टेक्निशियन,नर्सेस आणि सफाई काम करणार्या महिला यांचेच रॅकेट असून रिकाम्या झालेल्या बाटल्यांमध्ये सिरिंजव्दारे पॅरसिटीमल औषध किंवा पाणी भरुन या बोगस रेमडेसिवीर इंजेक्शनची 25 ते 30 हजारांपर्यंत विक्री केली जात आहे. शहरातील नामकिंत रुग्णालयात हा गोरखधंदा चालू आहे. विशेष म्हणजे एका खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या एका रुग्णाला आवश्यक नसतानाही रेमडेसिवीर घ्यायचे का? 30 हजारात उपलब्ध आहे अशी विचारणा करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
खासगी रुग्णालयाती तपासणी करा
शहरासह जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात असून या रुग्णालयांनी सदरील इंजेक्शन देखील काळ्याबाजारातूनच आणलेले आहेत. जिल्हाधिकारी जगताप आणि अन्न व औषध प्रशासनातील अधिकार्यांनी अचानक या रुग्णालयांची तपासणी करुन या रुग्णालयात असलेले साठे जप्त करावेत अशी मागणीही अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.
रुग्णांच्या जीवाशी खेळू नका-नाईकवाडे
काळ्याबाजारात घेतलेले रेमडेसिवीर इंजेक्शनमध्ये नेमके काय आहे? हे कोणालाही माहित नाही.तपासण्यासाठी ते प्रयोगशाळेत पाठवावे लागते मात्र गरजेपोटी काळ्याबाजारात इंजेक्शन उपलब्ध झाले की, जास्तीचे पैसे देवून खरेदी केले जाते. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी निदान काळ्याबाजारातून आणलेले इंजेक्शन रुग्णांना देवून त्यांच्या जीवाशी खेळू नये. काळाबाजार करणार्यांवर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केली आहे.
Leave a comment