बीडमध्ये मोहिमेला वेग;रस्ते झाले सामसुम
बीड । वार्ताहर
लॉकडाऊन कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवेसाठी सूट दिलेली आहे. मात्र त्यानंतर अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत; मात्र सोमवारपासून (दि.3) विनाकारण फिरणार्यांची जागेवरच अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यासाठी 10 पथके नियुक्त करण्यात आल्याचे आदेश बीड तहसीलदार शिरीष वमने यांनी जारी केलेे. सोमवारी सकाळपासूनच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळीवेस, बार्शीनाका, साठेचौक, नगरनाका आदी भागात आरोग्य विभागाच्या पथकाकडून दुचाकी आणि चारचाकी विनाकारण घराबाहेर पडणार्या नागरिकांशी अॅन्टिजेन टेस्ट करण्यात आली. कारवाईच्या भीतीने रस्ते सामसुम झाले.
कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत बीड जिल्ह्यात दि.15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला असुन सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत फक्त अत्यावश्क सेवा चालु ठेवण्यात आलेली आहे.पंरतू प्रशासनाच्या अश्या निदर्शणास आले आहे कि, सकाळी 11 नंतर ही काही नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत.यामुळे कोविड 19 साथरोगाचा प्रादुर्भावात बर्याच प्रमाणात वाढ झालेली आहे.त्यामुळे विनाकारण फिरणार्या नागरिकांची अॅन्टीजन टेस्ट करण्यात येवून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी एकुण 10 टिम कार्यान्वित करण्यात आल्या. सोमवारपासून सुरू झालेली ही मोहिम पुढील आदेशापर्यंत राबविण्यात येणार आहे.दरम्यान सोमवारी सकाळपासूनच बीड शहरात ठिकठिकाणी नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच दंडात्मक कारवायाही करण्यात आल्या. यात जे कोणी पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले गेले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
एसपी,डिवायएसपी उतरले रस्त्यावर
विना हेल्मेट पोलीसांनाही सुनावले
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीडमध्ये पहिल्यांदाच पोलीस अॅक्शनमध्ये दिसले. विनाकारण फिरणार्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देत स्वत:जिल्हा पोलीस अधीक्षक आर.राजा, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासह शहरातील तीनही ठाणे प्रमुखांनी रस्त्यावर उतरत वाहनचालकांवर कारवाया केल्या. शहरातील प्रमुख मार्गावर अनेक वाहनचालकांची धरपकड झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान यावेळी अधीक्षक आर.राजा यांना दोन पोलीस कर्मचारी विना हेल्मेट दुचाकीसह आढळून आल्यानंतर त्यांना थांबवत खडेबोल सुनावले. पोलीस असो की नागरिक माफी कोणालाही नाही असेही त्यांनी सुनावले.
तपासणी पथकातील डॉक्टरला पीपीई कीटमुळे भोवळ!
विनाकारण बाहेर फिरणार्या नागरिकांची अॅन्टीजेन टेस्ट सुरु झाल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झालेल्या आरोग्य पथकातील एका डॉक्टरांना पीपीई कीटमुळे असह्य त्रास सुरु झाला अन् काही वेळातच ते भोवळ आली. इतर सहकारी आरोग्य कर्मचार्यांनी त्यांना उपचारासाठी दाखल केले. दरम्यान मे हिटमध्ये प्रचंड उकाड्यात पीपीई कीट परिधान केल्यामुळे असा प्रकार घडल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. प्रशासनाने आरोग्य पथकाला रस्त्यावर थांबण्यासाठी निवार्याची व्यवस्था करणे गरचेचे असल्याचे यामुळे स्पष्ट झाले.
दुपारपर्यंत सापडले 19 बाधित
बीड शहरात सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत पेठ बीड, माळीवेस, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर व तपासणी ठिकाणी 211 नागरिकांनी अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. पैकी 19 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
हेल्मेट सक्तीमुळे नाराजी
बीड शहरात विनाकारण घराबाहेर फिरणार्यांची अॅन्टीजेन तपासणी तसेच चलन न भरणार्यांची वाहने जप्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी यंत्रणेला दिले आहेत. दरम्यान उच्च न्यायालयाने अत्यावश्यक सेवेतील अधिकारी,कर्मचारी व इतरांनाही दुचाकीवर फिरताना हेल्मेट वापरणे सक्तीचे असल्याचे आदेश दिलेले आहेत. त्या आदेशाचीही सोमवारी बीडमध्ये अंमलबजावणी झाली. स्वत: पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली. दरम्यान लॉकडाउन काळात हेल्मेट सक्तीमुळे नागरिकांत नाराजीचा सूर आळवला जात आहे.
Leave a comment