तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
भोकरदन । वार्ताहर
न्यायालयात जामीन का घेतला नाही म्हणून शेजारी राहणार्या एकास बेदम मारहाण करीत गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भोकरदन पोलिसांत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात राहणार्या विलास लक्ष्मण शेवाळे यांनी भोकरदन पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या घराशेजारी संतोष सुखलाल वाघ यांचे घर आहे. काही दिवसांपूर्वी संतोष वाघ यांच्यावर एका प्रकरणात भोकरदन पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी वाघ यांनी मला न्यायालयात माझा जामीन घ्यावा म्हणून सांगितले होते. मात्र, त्यावेळी मी नकार दिला होता. गुरुवारी दि.29 एप्रिलला मी माझ्या शेतात काम करत असताना संतोष वाघ यांचा फोन आला व मला सिल्लोड येथे काम आहे माझ्यासोबत चाल असे म्हणून आम्ही चारचाकी वाहनातून सिल्लोडला आलो यावेळी त्याच्यासोबत बाबासाहेब पगारे व गोट्या भागाजी तळेकर हे दोघे होते. सिल्लोड आल्यानंतर पुढे पिशोरला जायचे म्हणून पिशोरला गेलो. तेथील पोलीस ठाण्यात त्याचे काही काम होते ते करून आम्ही सर्वजण घरी परत येत असतांना वाघ व इतर दोघांनी दारू प्यायली व मलाही बाटलीत काहीतरी गुंगीचे औषध मिसळून बळजबरीने पाजली व नंतर काही वेळाने न्यायालयात माझा जामीन का घेतला नव्हता असे म्हणून शिवीगाळ करीत डोळ्यावर, पोटात बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पगारे व तळेकर यांनी मला पकडून ठेवले होते. वाघ यांनी माझा गळा आवळून माझ्या नाकावर मारून मला बेशुद्ध केले. व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच खिशातील मोबाईल व सहा हजार रुपये रोख रक्कम काढून घेतल्याचे शेवाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शेवाळे यांच्या फिर्यादीहून वरील तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजाराम तडवी हे करीत आहे.
Leave a comment